सिसपे इनफिनाईट बिकन कंपनीच्या घोटाळा.. दुबईत लपलेले सूत्रधार लवकरच भारतात,अपहार ४०० कोटींच्या पुढे जाण्याची शक्यता एसपी सोमनाथ घार्गे यांची पत्रकार परिषदेत माहिती
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-अहिल्यानगर जिल्ह्यात गाजलेल्या सिसपे इनफिनाईट बिकन कंपनीच्या बहुचर्चित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात पोलिस तपासाला निर्णायक वळण मिळाले असून, दुबईत लपून बसलेल्या दोन मुख्य आरोपींना आवश्यक परवानगी मिळताच भारतात आणले जाणार असल्याचा ठाम विश्वास जिल्हा पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी व्यक्त केला आहे. यासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलूबर्मे हेही उपस्थित होते.यावेळी बोलताना पोलीस अधीक्षक घार्गे म्हणाले की, सिसपे इनफिनाईट बिकन कंपनीच्या गैरव्यवहाराचा तपास अत्यंत शिस्तबद्ध व सखोल पद्धतीने करण्यात आला आहे. आतापर्यंत या प्रकरणात चार गुन्हे दाखल झाले असून, त्यामध्ये १४ कोटी ४७ लाख ९८ हजार ८४९ रुपयांचा अपहार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तपासादरम्यान या प्रकरणातील मुख्य सूत्रधार दुबईत पळून गेल्याची बाब उघडकीस आली आहे.
या आरोपींनी दुबईमध्ये नागरिकत्व मिळवण्यासाठी प्रत्येकी पाच कोटी रुपयांची तयारी दर्शविल्याचा गंभीर प्रकार तपासात समोर आला होता. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून हा डाव उधळून लावला आहे. संबंधित आरोपींविरोधात आंतरराष्ट्रीय स्तरावर शोध नोटीस काढण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून, पुढील टप्प्यात त्यांना भारतात आणण्यात येणार असल्याचेही पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केले.
अपहार ४०० कोटींच्या पुढे जाण्याची शक्यता
या घोटाळ्याची व्याप्ती अत्यंत मोठी असून सध्या समोर आलेला अपहाराचा आकडा हा प्राथमिक स्वरूपाचा आहे. तपास पुढे जात असताना हा अपहार ४०० कोटी रुपयांच्या पुढे जाण्याची दाट शक्यता असल्याचे पोलीस अधीक्षक घार्गे यांनी सांगितले. या प्रकरणात सहभागी असलेल्या मोठ्या मध्यस्थ, एजंट तसेच आर्थिक साखळीतील सर्व घटकांवर कठोर कारवाई केली जाणार असून, कुणालाही पाठीशी घातले जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.तपासात काही पोलीस कर्मचारी, डॉक्टर तसेच समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती या घोटाळ्यात अडकले असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. आर्थिक तणावामुळे काही प्रकरणांमध्ये आत्महत्याही झाल्याची गंभीर बाब असून, या सर्व घटनांचा तपास अत्यंत संवेदनशीलतेने केला जात असल्याचे घार्गे यांनी सांगितले. फसवणूक झालेल्या गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळावेत, यासाठी कायदेशीर मार्गाने जास्तीत जास्त रक्कम वसूल करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
शिर्डीतील ग्रो मोअर कंपनी व नगर अर्बन बँक प्रकरणाचाही तपास सुरू
दरम्यान, जिल्ह्यातील आर्थिक गुन्हे शाखेकडून सिसपे इनफिनाईट बिकन कंपनीसोबतच शिर्डी येथील ग्रो मोअर कंपनी व नगर अर्बन बँक प्रकरणातही मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार उघडकीस आले आहेत.शिर्डी येथील ग्रो मोअर कंपनीविरोधात दोन गुन्हे दाखल करण्यात आले असून, या प्रकरणात दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. तपासात या कंपनीकडून २८ कोटी ७१ लाख ५८ हजार ५२३ रुपयांचा अपहार झाल्याचे निष्पन्न झाले असून, गुंतवणूकदारांच्या हितासाठी शासनाकडे ५ कोटी ४८ लाख ५५ हजार ९५२ रुपयांचा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे.
नगर अर्बन बँक प्रकरणात मात्र अपहाराचा आकडा अधिक भयावह असून, बँकेच्या संचालकांविरोधात २९१ कोटी २५ लाख ६१ हजार रुपयांच्या अपहार व फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात १३ आरोपींविरोधात विशेष न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. तपासादरम्यान ३ कोटी १५ लाखांहून अधिक रक्कम गोठवण्यात आली असून, ७२ स्थावर मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. जप्त मालमत्तेची एकूण किंमत सुमारे ३४ कोटी ५७ लाख रुपये इतकी आहे.आर्थिक गुन्हे शाखेच्या या व्यापक व कडक कारवाईमुळे जिल्ह्यातील हजारो गुंतवणूकदारांमध्ये आशेचे वातावरण निर्माण झाले असून, येत्या काळात अपहृत रक्कम वसूल करण्यासाठी कारवाई आणखी तीव्र होणार असल्याचे संकेत पोलीस प्रशासनाने दिले आहेत.
