‘लाडक्या बहिणींसाठी मोठा दिलासा’..!…पैसे अडकले? किंवा केवायसी चुकली? आता फक्त ‘या’ नंबरवर करा एक कॉल प्रश्न सुटणार..!
मुंबई (प्रतिनिधी):-राज्यातील लाखो महिलांसाठी दिलासादायक बातमी आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी राज्य सरकारकडून विशेष हेल्पलाइन नंबर सुरू करण्यात आला असून, आता महिलांना त्यांच्या तक्रारी व शंकांचे थेट फोनवर निरसन करता येणार आहे. महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ‘एक्स’ (माजी ट्विटर) या समाजमाध्यमावरून ही माहिती दिली आहे.
राज्य सरकारने साधारण दीड वर्षांपूर्वी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची घोषणा केली होती. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १ हजार ५०० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. या योजनेचा लाभ राज्यातील लाखो महिलांना मिळत असून अनेक महिलांसाठी ही रक्कम कुटुंबाच्या दैनंदिन गरजांसाठी आधार ठरत आहे.मात्र, योजनेत काही गैरप्रकार उघडकीस आल्यानंतर सरकारने ई-केवायसी बंधनकारक केली. त्यानंतर अनेक लाभार्थींनी केवायसी पूर्ण केली असतानाही डिसेंबर महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यात जमा न झाल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात समोर आल्या. काही महिलांनी केवायसी करताना चुकीचा पर्याय निवडल्यामुळे त्यांचा लाभ स्थगित झाल्याचेही आढळून आले.
या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने महिलांची प्रत्यक्ष पडताळणी करण्याच्या सूचनाही दिल्या. त्यानंतर आता लाभार्थ्यांच्या अडचणी अधिक प्रभावीपणे सोडवण्यासाठी 181 हा विशेष महिला हेल्पलाइन नंबर उपलब्ध करून देण्यात आला आहे.
याबाबत माहिती देताना मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ई-केवायसी प्रक्रियेदरम्यान काही तांत्रिक कारणांमुळे किंवा चुकीच्या पर्यायामुळे लाभ बंद झाल्याच्या तक्रारी विभागाकडे प्राप्त झाल्या आहेत. तसेच योजनेशी संबंधित विविध शंका व अडचणी महिलांना येत आहेत. या सर्व तक्रारींचे फोन कॉलवर त्वरित निवारण करण्यासाठी 181 या महिला हेल्पलाइन नंबरवर मदत उपलब्ध करून देण्यात आली आहे.
या हेल्पलाइनसाठी संबंधित कॉल ऑपरेटर्सना आवश्यक ते विशेष प्रशिक्षण देण्यात आले असून, योजनेशी संबंधित सर्व तक्रारी, शंका व अडचणींचे निरसन 181 या नंबरवरून करण्यात येणार आहे. गरज भासल्यास सर्व लाडक्या बहिणींनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही मंत्री आदिती तटकरे यांनी केले आहे.दरम्यान, लाडकी बहीण योजनेतील लाभार्थींना आता जर कोणतीही अडचण आली, हप्ता थांबला, केवायसी संदर्भात समस्या निर्माण झाली किंवा इतर काही शंका असतील, तर थेट 181 या हेल्पलाइनवर संपर्क साधून तक्रारीचे निवारण करता येणार आहे. त्यामुळे योजनेतील अडचणी दूर होऊन महिलांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
