संगमनेरचा मान वाढला..! लोककलेचा जागतिक झेंडा फडकावणाऱ्या ज्येष्ठ लोककलावंत रघुवीर खेडकर यांना भारत सरकारचा मानाचा ‘पद्म’ पुरस्कार जाहीर
संगमनेर (प्रतिनिधी/राजेंद्र मेढे):-‘तमाशा’ या महाराष्ट्राच्या मातीतील लोककलेला सातासमुद्रापार पोहोचवणारे संगमनेरचे सुपुत्र आणि ज्येष्ठ लोककलावंत रघुवीर खेडकर यांना भारत सरकारचा मानाचा पद्म पुरस्कार जाहीर झाला आहे. या सन्मानाच्या घोषणेमुळे संपूर्ण अहिल्यानगर जिल्हा आणि विशेषतः संगमनेर तालुक्यात आनंदाचे वातावरण पसरले असून, लोककलेच्या क्षेत्रात नवचैतन्य निर्माण झाले आहे.तमाशा या पारंपरिक लोककलेला जागतिक व्यासपीठ मिळवून देण्याचे मोलाचे कार्य रघुवीर खेडकर यांनी आपल्या आयुष्यात केले आहे. त्यांच्या या योगदानाची दखल घेत केंद्र सरकारने त्यांना पद्म पुरस्काराने सन्मानित केल्याने, लोककलेच्या क्षेत्रात कार्य करणाऱ्या हजारो कलावंतांसाठी हा सन्मान प्रेरणादायी ठरला आहे.
लोककलेचा वारसा आणि संघर्ष
स्वर्गीय कांताबाई सातारकर यांनी जोपासलेला लोककलेचा अमूल्य वारसा रघुवीर खेडकर यांनी अत्यंत निष्ठेने पुढे चालवला. तमाशा क्षेत्रावर आलेले संकटाचे सावट दूर करून, या कलेला राष्ट्रीय स्तरावर प्रतिष्ठा मिळवून देण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी केवळ कला सादर केली नाही, तर तमाशा फडाचे नेतृत्व करत असताना कलावंतांच्या हक्कासाठीही ठामपणे लढा दिला.तमाशा ही केवळ करमणूक नसून ती ग्रामीण संस्कृतीची ओळख आहे, हे त्यांनी आपल्या कार्यातून सिद्ध केले. लोककलेला लोकाश्रयासोबतच राजाश्रय मिळवून देत, तमाशा कलेला गतवैभव प्राप्त करून देण्याचे ऐतिहासिक कार्य त्यांनी केले आहे.महाराष्ट्र राज्य तमाशा महामंडळाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी प्रभावी आणि दिशादर्शक कामगिरी केली.
तमाशा कलावंतांच्या प्रलंबित मागण्यांसाठी शासनाकडे सातत्याने यशस्वी पाठपुरावा केला.परंपरा जोपासली : लोकाश्रयासोबतच राजाश्रय मिळवून देत तमाशा कलेला गतवैभव प्राप्त करून दिले.रघुवीर खेडकर यांना जाहीर झालेल्या पद्म पुरस्कारामुळे संगमनेरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. या सन्मानामुळे तमाशा कलेला नवसंजीवनी मिळणार असून, येणाऱ्या पिढ्यांना लोककलेच्या संवर्धनासाठी प्रेरणा मिळणार आहे.“रघुभाऊंचा हा सन्मान म्हणजे त्यांच्या कलेप्रती असलेल्या निष्ठेचा आणि प्रामाणिकपणाचा विजय आहे. संगमनेरकरांसाठी हा अत्यंत अभिमानास्पद क्षण आहे.”
