प्रजासत्ताकदिनी चिंचोली गुरवमध्ये पत्रकारांचा गौरव सोहळा..खासदार भाऊसाहेब वाकचौरेंच्या हस्ते सन्मान
संगमनेर (चिंचोली गुरव):-भारतीय प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून चिंचोली गुरव येथे मेजर महेंद्र सोनवणे मित्र मंडळाच्या वतीने भव्य व प्रेरणादायी सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पत्रकारांचा तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा सन्मान खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन करण्यात आला.या सोहळ्यात सी जी न्यूज महाराष्ट्रचे पत्रकार तथा संपादक राजेंद्र मेढे,जनसंवाद चॅनलचे संपादक तथा सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रय घोलप,सरपंच माझाचे संपादक रामनाथ बोऱ्हाडे यांच्यासह अन्य मान्यवर पत्रकारांचा गौरव करण्यात आला.समाजातील विविध घटकांशी सातत्याने संवाद साधत सत्य, निर्भीड आणि वस्तुनिष्ठ पत्रकारिता करणाऱ्या पत्रकारांच्या कार्याची दखल घेऊन हा सन्मान करण्यात आला.
देशाच्या सीमेवर सेवा बजावलेले भारतीय सैनिक मेजर महेंद्र सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली चालणाऱ्या मित्र मंडळाने सामाजिक बांधिलकी जपत प्रजासत्ताक दिनी हा स्तुत्य उपक्रम राबवला. लोकशाहीचा चौथा स्तंभ असलेल्या पत्रकारितेचा सन्मान करणे हे समाजाचे कर्तव्य आहे, ही भावना या कार्यक्रमामागे होती.यावेळी बोलताना खासदार भाऊसाहेब वाकचौरे म्हणाले की,“पत्रकार हे समाजातील वास्तव मांडण्याचे महत्त्वपूर्ण काम करतात. ग्रामीण भागातील प्रश्न शासन व प्रशासनापर्यंत पोहोचवण्यात पत्रकारांचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. मेजर महेंद्र सोनवणे मित्र मंडळाने प्रजासत्ताक दिनी अशा कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान करून आदर्श उपक्रम राबवला आहे.”या कार्यक्रमाला मेजर महेंद्र सोनवणे मित्र मंडळाचे पदाधिकारी, चिंचोली गुरव ग्रामस्थ, विविध क्षेत्रांतील मान्यवर, ग्रामपंचायत सदस्य तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण कार्यक्रम उत्साहात आणि देशभक्तीच्या वातावरणात पार पडला.
