अतिक्रमण कारवाईत अनेक संसार उद्ध्वस्त! लहान व्यावसायिकांसाठी वज्रदेही महिला विकास संघाचे जिल्हाधिकाऱ्यांना साकडे
वाशिम (प्रतिनिधी):-वाशिम शहरातील सिव्हिल लाईन परिसरात देशमुख हॉस्पिटलपासून महिला बचतगट परिसरापर्यंत नुकत्याच करण्यात आलेल्या अतिक्रमण हटाव कारवाईमुळे अनेक लहान व्यावसायिकांचे व्यवसाय उद्ध्वस्त झाले असून,यामुळे अनेक कुटुंबांचे एकमेव उदरनिर्वाहाचे साधन अचानक बंद झाले आहे.या पार्श्वभूमीवर बाधित लहान व्यावसायिकांच्या पुनर्वसनासाठी व आर्थिक सहाय्यासाठी वज्रदेही महिला विकास संघ,वाशिम यांच्या वतीने जिल्हाधिकारी व नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांना सविस्तर निवेदन सादर करण्यात आले आहे.सदर दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, अतिक्रमण हटाव कारवाई दरम्यान अनेक लहान व्यावसायिकांचे व्यवसाय हटविण्यात आले.हे लहान व्यवसाय केवळ उपजीविकेचे साधन नसून अनेक गरीब, कष्टकरी व महिलांच्या कुटुंबांचा आर्थिक आधार आहेत.विशेषतः महिला बचत गटाशी संबंधित महिला स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी हे व्यवसाय करत होत्या.अचानक झालेल्या कारवाईमुळे त्यांच्या समोर उपासमारीचे व आर्थिक असुरक्षिततेचे गंभीर संकट उभे ठाकले आहे.शासनाचे नियम व शहर सुशोभीकरणाची गरज आम्ही मान्य करतो;मात्र या प्रक्रियेत गरजू नागरिकांच्या जगण्याचा प्रश्न निर्माण होऊ नये, ही अपेक्षा निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.सामाजिक न्याय व मानवतेच्या दृष्टीने बाधित कुटुंबांना संरक्षण मिळणे अत्यावश्यक असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

वज्रदेही महिला विकास संघाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना पुढील मागण्या करण्यात आल्या आहेत
•बाधित लहान व्यावसायिकांना तातडीने पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी.
• त्यांचे योग्य पुनर्वसन करण्यासाठी विशेष योजना राबवावी.
• नुकसानीग्रस्त कुटुंबांना आर्थिक सहाय्य देण्याचा सकारात्मक विचार करावा.
• भविष्यात अशा कारवाईपूर्वी पुनर्वसन व समन्वय साधावा.
निवेदनाच्या शेवटी, आपण संवेदनशीलतेने व न्यायाच्या भूमिकेतून सकारात्मक निर्णय घ्यावा,अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली असून,आपल्या हस्तक्षेपामुळे अनेक गरजू कुटुंबांचे जीवन पुन्हा उभे राहू शकते,असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.सदर निवेदनावर चेतन संतोष इंगोले,गणेश मापारी,सचिन खोटे,रवी खोटे,श्रावण भालेराव, संतोष आठवले,शिवा वाणी सय्यद मोबीन,विठ्ठल जाधव राहुल लबडे,सुरेश आवटे,प्रशांत तायडे,दीपक मोरे,प्रवीण पाटील, वैभव जंगले,चंद्रभागा काळे, राधाबाई धवसे,सुमनबाई अंभोरे, पठाण,प्रमोद गाडेकर,नितीन गाडेकर,गन्ना कांबळे,यांच्या स्वाक्षरी असून,वज्रदेही महिला विकास संघाच्या संस्थापक अध्यक्षा आरतीताई ठोके यांच्या वतीने हे निवेदन सादर करण्यात आले आहे.
