Crime..वाळू चोरट्यांमध्ये खळबळ..! LCB ची अवैध वाळू माफियांवर करडी नजर…तब्बल 50 लाखांचा मुद्देमाल जप्त
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-शेवगाव व पाथर्डी पोलीस स्टेशन हद्दीत अवैध वाळू उपसा व वाहतूक करणाऱ्यां विरोधात स्थानिक गुन्हे शाखेने जोरदार कारवाई करत तब्बल 50 लाख 70 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.या प्रकरणी तीन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले असून चार आरोपीं विरोधात कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या टोळ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ घार्गे यांनी जिल्ह्यात वाढत चाललेल्या अवैध वाळू वाहतुकी विरोधात कठोर कारवाईचे आदेश दिले होते.त्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक श्री.किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथके तयार करून ही कारवाई राबविण्यात आली.
पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग,राजेंद्र वाघ तसेच पोलीस अंमलदार हृदय घोडके,दीपक घाटकर, संतोष खैरे,सुयोग सुपेकर, श्यामसुंदर जाधव,सोमनाथ झांबरे,बाळासाहेब नागरगोजे, किशोर शिरसाठ व बाळासाहेब खेडकर यांच्या पथकांनी मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार सलग तीन दिवस छापे टाकले.दि.29 जानेवारी 2026 रोजी पाथर्डी पोलीस स्टेशन हद्दीत,30 जानेवारी 2026 रोजी शेवगाव पोलीस स्टेशन हद्दीत तसेच 31 जानेवारी 2026 रोजी सकाळी पुन्हा पाथर्डी पोलीस स्टेशन हद्दीत अवैधरीत्या चोरून वाळू वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली.स्थानिक गुन्हे शाखेच्या या ठोस कारवाईमुळे शेवगाव व पाथर्डी परिसरातील अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांचे धाबे दणाणले असून, यापुढेही अशा अवैध धंद्यांविरोधात सतत व कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.
