छेडछाड सहन करू नका आवाज बुलंद करा..महिलांच्या सुरक्षेसाठी कुटुंब-समाजाने पुढे यावे-राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्षा विजया रहाटकर
अहिल्यानगर (प्रतिनिधी) – मुली आणि महिलांना सुरक्षा व सन्मान देणे ही केवळ पोलिसांची जबाबदारी नसून कुटुंब आणि समाजानेही तितक्याच ठामपणे पुढे यायला हवे. मुलींना आपला आवाज बुलंद करता आला पाहिजे; अन्यथा सुरुवातीला किरकोळ वाटणारी छेडछाड किंवा पाठलागाची घटना पुढे गंभीर गुन्ह्यात परिवर्तित होऊ शकते, असे ठाम प्रतिपादन विजया रहाटकर यांनी केले.स्नेहालय आणि राष्ट्रीय महिला आयोग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘महिलांची छेडछाड आणि पाठलाग’ या विषयावर आयोजित दोन दिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या.
या वेळी महाराष्ट्राच्या महिला सुरक्षेची जबाबदारी असलेल्या अतिरिक्त पोलिस महासंचालक आश्वती दोरजे, तेलंगणातील प्रज्वला संस्थेच्या डॉ. सुनिता कृष्णन, तेलंगणाचे अतिरिक्त पोलिस महासंचालक महेश भागवत, न्यायाधीश योगेश पैठणकर, अॅड. शिरीन मर्चंट, जिल्हा पोलिस प्रमुख सोमनाथ घार्गे आदी मान्यवर उपस्थित होते.रहाटकर म्हणाल्या, मुलींची छेड काढणे किंवा तिच्या इच्छेविरुद्ध पाठलाग करणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. अनेकदा “असं होत असतं”, “दुर्लक्ष कर”, “रस्ता बदल” अशा समजुतींमुळे मुली गप्प बसतात; पण हीच दुर्लक्षाची वृत्ती पुढे मोठ्या गुन्ह्याला खतपाणी घालू शकते. घरात संवादाचा अभाव असल्याने मुली मनातील भीती व्यक्त करू शकत नाहीत. परिणामी त्या मानसिक तणाव, नैराश्य आणि एकलकोंडेपणाच्या विळख्यात अडकतात.
“ज्या घरात मुलीला मोकळेपणाने बोलता येते, ती कधीच पिडीत किंवा शोषित होणार नाही,” असे त्या ठामपणे म्हणाल्या.स्नेहालयचे संस्थापक डॉ. गिरीश कुलकर्णी यांनी संस्थेच्या महिला सक्षमीकरणाच्या उपक्रमांची माहिती देत १४ फेब्रुवारी हा दिवस ‘व्हॅलेंटाईन डे’ऐवजी ‘अँटी स्टॉकिंग डे’ म्हणून साजरा करण्याचा अभिनव प्रस्ताव मांडला. या सूचनेला रहाटकर यांनीही समर्थन दिले.स्नेहाधारच्या अहिल्यानगर आणि पुण्यातील कामकाजाविषयी विद्या घोरपडे व मानसी चंदगडकर यांनी माहिती दिली. स्नेहालयाचे संचालक हनिफ शेख यांनी विविध प्रकल्पांचे सादरीकरण केले. नीक कॉक्स आणि स्वाती भटकळ यांनी ‘स्टॉकिंग’ विषयावरील माहितीपट सादर केला.कार्यक्रमाच्या प्रारंभी स्नेहालयाच्या विद्यार्थिनी साक्षी हिने बाबा आमटे यांच्या ‘थांबला ना सूर्य कधी…’ व ‘दिवारे उची है…’ या कविता सादर केल्या, तर आयएमएस अकॅडमी अँड परफॉर्मिंग आर्ट्सच्या विद्यार्थिनींनी भरतनाट्यम सादर केले. सूत्रसंचालन रूपाली खरडकर यांनी केले.
दरम्यान, टाल्कमयुक्त फेसपावडरमुळे त्वचेच्या कर्करोगाचा धोका संभवतो, असे संशोधनातून स्पष्ट झाले असल्याची माहिती देत स्नेहालयात टाल्कममुक्त फेसपावडर तयार करण्यात आली. या उत्पादनाचे लोकार्पण कार्यशाळेत करण्यात आले. तसेच टाल्कमयुक्त पावडरच्या उत्पादन व विक्रीवर भारतात बंदी घालावी, अशी मागणी निवेदनाद्वारे रहाटकर यांच्याकडे करण्यात आली.कार्यशाळेच्या माध्यमातून महिलांच्या सुरक्षेसाठी कायदेशीर उपाययोजना अधिक प्रभावी करण्याचा आणि समाजात जागरूकता निर्माण करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
