जय भवानी…जय शिवाजी च्या घोषणांनी सुपा दुमदुमले! मनसेकडून शिवजयंती उत्साहात सामाजिक कार्यकर्त्यांचा गौरव
सुपा (प्रतिनिधी):- स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती सुपा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सुपा–पारनेर रोडवरील जुन्या पोलीस स्टेशन शेजारी ६ मार्च रोजी सकाळी ९.३० वाजता आयोजित कार्यक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन जेष्ठ नागरिक तात्याभाऊ पवार यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाला सुपा पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी,पारनेर तालुका दूध संघाचे माजी अध्यक्ष तथा माजी उपसरपंच दत्तानाना पवार,मनसे सरचिटणीस सागर मैड,महाराष्ट्र राज्य शिवपाणंद शेतरस्ता चळवळीचे प्रणेते शरद पवळे,कडुस मनसे ग्रामपंचायत सदस्य नारायण नरवडे,सुपा शहर अध्यक्ष अक्षय सुर्यवंशी, माजी सरपंच बाळासाहेब पवार, सेवा सोसायटीचे संचालक पांडुरंग पवार,कामगार सेना अध्यक्ष कल्याण शहाणे,तालुका उपाध्यक्ष विरेंद्र थोरात, खरेदी-विक्री संघाचे संचालक सुनील पवार,अॅम्बुलन्स चालक सादिक भाई शेख,गीतकार अरूण वाळुंज तसेच उद्योजक अतुल शेठ शहाणे यांच्यासह शिवसैनिक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सामाजिक कार्यकर्त्यांचा सन्मान
शिवजयंतीचे औचित्य साधून विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात आला.शेतकरी बांधवांसाठी शेत-पाणंद रस्ते चळवळ उभारणारे शरद पवळे यांचा पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांचा सन्मान अविनाश पवार यांच्या हस्ते करण्यात आला.नगर-पुणे महामार्गावर अपघातग्रस्तांना तातडीने मदत करणारे अॅम्बुलन्स चालक सादिक भाई शेख यांचा गौरव करण्यात आला.सुपा परिसरात सेवा देणारे वाहतूक पोलीस, तसेच महावितरणचे वायरमन जरे, थोरात, विटेकर यांचा सन्मान झाला.पारनेर तालुक्यातील पत्रकार शरद रसाळ, सुभाष दिवटे आणि दत्ता गाडगे यांचाही शाल-श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला.
घोषणांनी परिसर दुमदुमला
कार्यक्रमादरम्यान मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांची आरती करण्यात आली. यावेळी “छत्रपती शिवाजी महाराज की जय”, “जय भवानी जय शिवाजी”, “हर हर महादेव” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.१६ वर्षांची परंपरा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेली ही शिवजयंती सलग १६ वे वर्ष उत्साहात साजरी करण्यात आली.कार्यक्रमाचे आयोजन मनसेचे तालुकाध्यक्ष अविनाश मुरलीधर पवार आणि सुपा शहर अध्यक्ष अक्षय सुरेश सुर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरूण वाळुंज यांनी केले तर उपस्थितांचे आभार शरद पवळे यांनी मानले.
