घाटात दरोड्याचा थरारक कट उधळला..! स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई ४ सराईत आरोपी ताब्यात
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-मढी घाट परिसरात दरोडा टाकण्याच्या तयारीत दबा धरून बसलेल्या सराईत दरोडेखोरांच्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश करत चार आरोपींना ताब्यात घेतले.पोलिसांच्या धडक कारवाईमुळे संभाव्य मोठा गुन्हा घडण्यापूर्वीच उधळण्यात आला आहे.पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात दरोडे,घरफोडी आणि रोड रॉबरीसारख्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी विशेष पेट्रोलिंग सुरू आहे.त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि. अनंत सालगुडे तसेच पोलीस अंमलदार विजय पवार, बाळासाहेब नागरगोजे,सोमनाथ झांबरे,सागर ससाणे,बाळासाहेब गुंजाळ आणि चालक चंद्रकांत कुसळकर यांच्या पथकाने मढी यात्रा बंदोबस्तासह दरोडा प्रतिबंधक पेट्रोलिंग सुरू केले होते.दरम्यान,पथकाला गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की,रेकॉर्डवरील गुन्हेगार आकाश मोहन डुकरे आणि विकास उर्फ सुनिल दत्तु म्हस्के हे त्यांच्या अन्य 4 ते 5 साथीदारांसह मढी ते पाथर्डी रस्त्यावर मढी घाटात सशस्त्र दरोडा टाकण्याच्या तयारीत थांबले आहेत.माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ त्या ठिकाणी धाड टाकली. अंधारात रस्त्याच्या कडेला हातात हत्यारे घेऊन संशयास्पदरीत्या उभ्या असलेल्या काही व्यक्तींवर पोलिसांनी सापळा रचून कारवाई केली.यावेळी चार आरोपींना ताब्यात घेण्यात यश आले,तर इतर काही जण अंधाराचा फायदा घेत पसार झाले.
ताब्यात घेतलेल्या आरोपींनी आपली नावे0आकाश मोहन डुकरे (वय 26,रा.विजयनगर, पाथर्डी,जि.अहिल्यानगर),विकास उर्फ सुनिल दत्तु म्हस्के (वय 25,रा.माणिक दौंडी चौक, पाथर्डी,जि.अहिल्यानगर),अदित्य दिपक बोरकर (वय 23, रा.तनपुरे गल्ली,राहुरी,ता. राहुरी, जि.अहिल्यानगर),शरद श्रीरंग जाधव (वय 40,रा.वागल खेडा, ता.अंबड,जि.जालना) अशी असल्याचे सांगितले.पंचासमक्ष आरोपींची अंगझडती घेतली असता त्यांच्या ताब्यातून ३ मोबाईल फोन आणि एक स्क्रू ड्रायव्हर असा सुमारे १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.तपासात समोर आले की, आरोपी आकाश मोहन डुकरे याच्यावर यापूर्वी अहिल्यानगर, पुणे आणि सातारा जिल्ह्यांमध्ये खून, दरोडा, खुनाचा प्रयत्न यांसारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत.तसेच विकास उर्फ सुनिल दत्तु म्हस्के आणि अदित्य दिपक बोरकर यांच्यावरही विविध पोलिस ठाण्यांमध्ये दरोडा, चोरी व इतर गुन्ह्यांची नोंद आहे.या प्रकरणी आरोपींना मुद्देमालासह पाथर्डी पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले असून त्यांच्याविरुद्ध गु.र.नं. 218/2026 नुसार भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 310(4), 310(5), 310(6) अंतर्गत दरोड्याची तयारी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पाथर्डी पोलीस करीत आहेत.ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने यशस्वीपणे पार पाडली.
