५० दिवसांचा कामांचा धडाका..! उपमहापौर धनंजय जाधवांचा ‘परफॉर्मन्स रिपोर्ट’ सादर..पालकमंत्र्यांकडून शाबासकी..आरोग्य,स्वच्छता, शिक्षणात बदल उपमहापौरांचा रिपोर्ट ठरला चर्चेचा विषय
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-अहिल्यानगर महानगरपालिकेचे उपमहापौर श्री.धनंजय कृष्णा जाधव यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवघ्या ५० दिवसांत केलेल्या विविध विकासकामांचा सविस्तर ‘कार्य अहवाल’ राज्याचे महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना सादर करून आपल्या कार्यतत्परतेची छाप पाडली आहे.या अहवालामुळे शहराच्या विकासाचा वेग वाढल्याचे चित्र स्पष्ट होत असून, राजकीय वर्तुळातही या कामगिरीची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.या अहवाल सादरीकरणाच्या वेळी भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अनिलजी माहिते,जिल्हाध्यक्ष दिलीपराव भालसिंग,दादासाहेब सोनमाळी, काका धांडे,स्वप्नील दगडे यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
🔹विकासकामांचा आढावा
उपमहापौर जाधव यांनी अल्पावधीत शहरातील मूलभूत समस्यांवर लक्ष केंद्रित करत विविध क्षेत्रांत ठोस पावले उचलली आहेत.अहवालात आरोग्य,स्वच्छता,शिक्षण आणि सार्वजनिक सेवा या प्रमुख विभागांतील कामांचा सविस्तर उल्लेख करण्यात आला आहे.
शहरातील आरोग्य व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी आरोग्य केंद्रांचे सक्षमीकरण करण्यात आले असून, नागरिकांना वेळेत व दर्जेदार उपचार मिळावेत यासाठी विशेष उपाययोजना राबवण्यात आल्या.
‘स्वच्छ नगर, सुंदर नगर’ या संकल्पनेअंतर्गत शहरभर स्वच्छता मोहिमा राबवून कचरा व्यवस्थापन आणि ड्रेनेज समस्यांवर तातडीने कार्यवाही करण्यात आली.मनपा शाळांचा दर्जा उंचावण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शिक्षण विभागातही सक्रिय काम करण्यात आले.
याशिवाय,उपमहापौरांनी शहरातील सरकारी रुग्णालयांना प्रत्यक्ष भेटी देत तेथील सुविधा तपासल्या.रुग्णांना मिळणाऱ्या सेवांबाबत प्रशासनाला स्पष्ट व कडक सूचना देण्यात आल्या.
🔹 पालकमंत्र्यांची शाबासकी
अहवाल स्वीकारल्यानंतर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उपमहापौर जाधव यांच्या कामाचे कौतुक करत, लोकप्रतिनिधींनी आपल्या कामाचा हिशोब जनतेसमोर मांडणे ही पारदर्शकतेची चांगली पद्धत असल्याचे सांगितले. त्यांनी जाधव यांच्या कार्यपद्धतीचे अभिनंदन करत भविष्यातही अशीच कामगिरी सुरू ठेवण्याचा विश्वास व्यक्त केला.
🔹 ‘शहराचा कायापालट करणार’ – जाधव
यावेळी बोलताना उपमहापौर धनंजय जाधव म्हणाले की, “पालकमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली आणि पक्ष संघटनेच्या सहकार्याने शहराचा सर्वांगीण विकास करण्याचा आमचा निर्धार आहे. हे केवळ ५० दिवसांचे काम असून, पुढील काळात प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही अधिक वेगाने काम करणार आहोत.”
🔹नागरिकांतून समाधान
या कार्य अहवालामुळे शहरातील विकासकामांना गती मिळाल्याचे चित्र स्पष्ट होत असून, नागरिकांमधूनही समाधान व्यक्त केले जात आहे. उपमहापौरांच्या कार्यशैलीमुळे प्रशासन अधिक गतिमान झाल्याची भावना नागरिकांमध्ये दिसून येत आहे.
