भिंगारमध्ये ‘DJ मुक्त’ रामनवमी मिरवणुकीचा आदर्श..पारंपरिक जल्लोषात साजरा श्रीराम जन्मोत्सव!सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर यांच्या हस्ते कार्यकर्त्यांचा सत्कार
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-भिंगार शहरात यावर्षी श्रीराम नवमी उत्सव अत्यंत पारंपरिक आणि शिस्तबद्ध वातावरणात साजरा करण्यात आला. श्रीराम जन्मोत्सव समिती व सकल हिंदू समाज भिंगार यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मिरवणुकीने ‘DJ मुक्त मिरवणूक’ या संकल्पनेला सकारात्मक प्रतिसाद देत एक आदर्श निर्माण केला.पोलिस विभागाने राबवलेल्या DJ मुक्त मिरवणूक अभियानाला मान देत, कोणत्याही प्रकारच्या DJ चा वापर न करता ही मिरवणूक पारंपरिक पद्धतीने काढण्यात आली.या उपक्रमाचे शहरात सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
मिरवणुकीत महिला भजनी मंडळांच्या सुरेल भजनांनी भक्तीमय वातावरण निर्माण केले होते.तसेच शिवकालीन मर्दानी खेळांचे सादरीकरण करत तरुणांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची झलक दाखवली.पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशांचा गजर आणि धार्मिक उत्साह यामुळे संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला.या प्रसंगी पोलिस प्रशासनाकडूनही मिरवणुकीस विशेष सहकार्य करण्यात आले. कॅम्प पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर यांनी मंडळाच्या कार्यकर्त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.पोलिस व आयोजक यांच्यातील समन्वयामुळे मिरवणूक शांततेत व उत्साहात पार पडली.DJ मुक्त,पारंपरिक आणि शिस्तबद्ध मिरवणुकीमुळे भिंगार शहराने यंदा रामनवमी उत्सव साजरा करण्याचा एक नवा आदर्श घालून दिला आहे.
