RTE प्रवेशासाठी बौद्ध महासभेचा एल्गार! ऑनलाईन पोर्टल नाकारणाऱ्या शाळांविरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन..शहर संघटक संतोष जाधव यांच्या नेतृत्वाखाली लढ्याला मोठे यश
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (RTE) आर्थिकदृष्ट्या मागास, दुर्बल व वंचित घटकातील बालकांना मोफत व सक्तीचे शिक्षण मिळावे,यासाठी भारतीय बौद्ध महासभा शहर शाखा अहिल्यानगर यांनी जोरदार पाठपुरावा करत प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.अनेक शाळा RTE अंतर्गत विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाईन पोर्टलवर स्वीकारत नसल्याच्या गंभीर तक्रारीनंतर महासभेने थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेत निवेदन सादर केले.दि.26 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11.30 वाजता महासभेच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी कार्यालय,अहिल्यानगर तसेच जिल्हा परिषद शिक्षण अधिकारी कार्यालय येथे भेट देत संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन दिले. यावेळी शाळांकडून सुरू असलेल्या मनमानीमुळे गरीब व वंचित कुटुंबातील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हक्क हिरावले जात असल्याचा मुद्दा ठळकपणे मांडण्यात आला.महासभेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाला स्पष्ट इशारा देत, RTE अंतर्गत प्रवेश प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा भेदभाव किंवा अडथळा सहन केला जाणार नसल्याचे सांगितले.तसेच सर्व पात्र विद्यार्थ्यांना तात्काळ प्रवेश मिळावा, यासाठी कठोर कारवाईची मागणी करण्यात आली.
या आंदोलनाला शहर संघटक संतोष जाधव यांच्या नेतृत्वाखाली यश मिळाले. त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे आणि पाठपुराव्यामुळे प्रशासनाने या प्रकरणाची दखल घेतली. या मोहिमेत दीपकजी पाटोळे सर,वसंत मेघ,संदीप वाघमारे, संजय डहाणे यांनी सक्रिय सहभाग घेत महत्त्वाची भूमिका बजावली.“शिक्षण हा हक्क आहे, उपकार नाही” – या भूमिकेतून बौद्ध महासभेने उचललेले हे पाऊल शहरात चर्चेचा विषय ठरत असून, प्रशासन आता यावर काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
