Oppression..दुसऱ्यांदा ‘अत्याचार’ प्रकरणात अहिल्यानगरचा माजी महापौर कळमकर अडकला..! व्हिडीओच्या धमकीने तरुणीला करत होता ब्लॅकमेल
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-अहिल्यानगर शहराच्या राजकीय वर्तुळात खळबळ उडवणारी घटना समोर आली असून माजी महापौर तथा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर याच्याविरुद्ध अत्याचाराचा आणखी एक गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.फकीरवाडा परिसरातील एका तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदविण्यात आला आहे.पीडित तरुणीच्या म्हणण्यानुसार, लोकसभा निवडणुकीच्या प्रचारा दरम्यान तिची कळमकर यांच्याशी ओळख झाली होती. या ओळखीचा फायदा घेत आरोपीने तिला नोकरीचे आमिष दाखवून भिंगार कॅम्प परिसरातील नगर क्लबजवळ बोलावले.तेथे तिला पाण्यातून गुंगीचे औषध देऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आला. एवढेच नव्हे तर या संपूर्ण प्रकाराचे व्हिडीओ चित्रीकरण करून ते व्हायरल करण्याची धमकी देत तिला सतत ब्लॅकमेल करण्यात आले. “मी जेव्हा बोलावेल तेव्हा यायचे,” अशी धमकीही आरोपीने दिल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.अभिषेक कळमकर याच्याविरुद्ध यापूर्वीही तोफखाना पोलीस ठाण्यात अशाच प्रकारचा अत्याचाराचा गुन्हा दाखल आहे. त्या प्रकरणातही एका महिलेला शाळेत नोकरीचे आमिष दाखवून अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे आता दुसरा गुन्हा समोर आल्यानंतर प्रकरण अधिक गंभीर बनले आहे.या प्रकरणात न्यायालयाने कळमकर याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला असून त्याच्याविरुद्ध स्टँडिंग अटक वॉरंट जारी करण्यात आले आहे.
मात्र, तो अद्याप फरार असून पोलिसांना तो सापडलेला नाही. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून “तो सापडत नाही की कोणाचा दबाव आहे?” अशी चर्चा शहरात रंगू लागली आहे.कळमकर यांनी यापूर्वी नगर शहरातून विधानसभा निवडणूक लढवली होती,मात्र त्यांचा पराभव आमदार संग्राम जगताप यांनी केला होता. सध्या ते पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष पद भूषवत आहेत. त्यांच्या विरोधात आता दोन अत्याचाराचे गुन्हे दाखल झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.पूर्वीच्या प्रकरणात कळमकर यांनी हा आरोप “राजकीय षडयंत्र” असल्याचे म्हटले होते. मात्र आता दुसरा गुन्हा समोर आल्यानंतर त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.सध्या पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू असल्याचे सांगण्यात येत असले तरी अद्याप त्याचा मागमूस लागत नसल्याने संशय अधिक गडद होत आहे. दरम्यान, या प्रकरणामुळे शहरातील राजकारण आणि कायदा-सुव्यवस्थेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.
