हद्दपारीचा आदेश धाब्यावर बसवून जिल्ह्यात एन्ट्री..भिंगार कॅम्प पोलिसांची धाडसी कारवाई..सराईत गुंडाच्या पिस्टलसह आवळल्या मुसक्या
अहिल्यानगर (प्रतिनिधी):- भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनच्या हद्दीत गावठी पिस्तूल आणि जिवंत काडतुसे बाळगणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी रंगेहात पकडले आहे. आकाश संजय पवार (वय २६, रा.ब्रह्मतळे,ता.जि. अहिल्यानगर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून,तो जिल्ह्याबाहेर हद्दपार असतानाही शहरात वावरत असल्याचे समोर आले आहे. दि.१३ एप्रिल २०२६ रोजी भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर यांना गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की, बाराबाभळी शिवारातील हॉटेल शौर्य समोर एक तरुण कंबरेला गावठी पिस्तूल लावून संशयास्पदरीत्या फिरत आहे. माहिती मिळताच सपोनि.मुलगीर यांनी तपास पथकाला तात्काळ कारवाईचे आदेश दिले.फिल्मी स्टाईलने लावला सापळा पोलिसांनी बातमीतील ठिकाणी जाऊन सापळा लावला. पोलिसांची चाहूल लागताच आरोपीने पळून जाण्याचा प्रयत्न केला,मात्र सतर्क असलेल्या पोलीस पथकाने त्याला जागीच झडप घालून पकडले.त्याची झडती घेतली असता कंबरेला एक गावठी बनावटीचे पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे मिळून आली.हद्दपारीचा भंग करून आला होता शहरात अधिक तपासात धक्कादायक माहिती समोर आली की,आरोपी आकाश पवार याला उपविभागीय दंडाधिकारी नगर भाग यांनी १६ एप्रिल २०२४ पासून दोन वर्षांकरिता अहिल्यानगर जिल्ह्यातून हद्दपार केले होते.
हद्दपारीचा आदेश लागू असतानाही त्याने कायद्याचा भंग करून जिल्ह्यात प्रवेश केला होता.या प्रकरणी त्याच्यावर आर्म ॲक्ट आणि महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कामगिरी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे,अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक कॅम्प पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर,पोलीस अंमलदार योगेश पवार,विलास गारुडकर,रामनाथ डोळे आणि प्रमोद लहारे यांच्या पथकाने केली.भिंगार कॅम्प पोलिसांच्या या धाडसी कारवाईचे सर्वत्र कौतुक होत आहे.
