अहिल्यानगर जिल्ह्याला उन्हाचा तडाखा..शाळांच्या वेळेत मोठा बदल; आता ‘या’ वेळेत भरणार शाळा..जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांचे आदेश!
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-राज्यात सूर्याचा पारा चढू लागल्याने नागरिकांच्या अंगाची लाहीलाही होत आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातही उष्णतेची तीव्र लाट निर्माण झाली असून, याचा सर्वाधिक फटका शालेय विद्यार्थ्यांना बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याची सुरक्षितता लक्षात घेऊन जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या शाळांच्या वेळेत महत्त्वपूर्ण बदल करण्याचे आदेश दिले आहेत.
🕙 नवीन वेळापत्रक काय असेल?
जिल्हा प्रशासनाने जारी केलेल्या आदेशानुसार, १८ एप्रिल २०२६ पासून ते उन्हाळी सुट्टी जाहीर होईपर्यंत जिल्ह्यातील सर्व शाळांची वेळ आता सकाळी ७:०० ते ११:०० अशी निश्चित करण्यात आली आहे. भरदुपारी वाढणाऱ्या तापमानापासून मुलांचा बचाव व्हावा, हा यामागचा मुख्य उद्देश आहे.
🌡️यलो अलर्ट’ आणि खबरदारी
भारतीय हवामान खात्याने (IMD) जिल्ह्यासाठी उष्णतेच्या लाटेचा ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. कडाक्याच्या उन्हामुळे विद्यार्थ्यांना उष्माघाताचा (Heat Stroke) त्रास होऊ शकतो. ही आपत्कालीन स्थिती लक्षात घेता, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष या नात्याने जिल्हाधिकाऱ्यांनी ‘आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५’ अंतर्गत आपले अधिकार वापरून हे निर्देश दिले आहेत.
📋 शाळा आणि शिक्षकांसाठी महत्त्वाच्या सूचना:
शाळा व्यवस्थापन: प्रत्येक शाळेने आपापल्या व्यवस्थापन समितीची तातडीने मंजुरी घेऊन या निर्णयाची अंमलबजावणी करावी.शिक्षकांची उपस्थिती: विद्यार्थ्यांसाठी शाळा ११ वाजता सुटणार असली, तरी शिक्षकांसाठी नियम वेगळे आहेत. परीक्षेचे कामकाज आणि निकाल तयार करण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी शिक्षकांना सकाळी ७ ते दुपारी १२ या वेळेत शाळेत उपस्थित राहावे लागणार आहे.माहितीचा प्रसार: सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांपर्यंत ही माहिती तातडीने पोहोचवण्याचे निर्देश शिक्षण विभागाला देण्यात आले आहेत.
“विद्यार्थ्यांचे आरोग्य ही आमची प्राथमिकता आहे. उन्हाच्या तीव्रतेमुळे कोणतीही अनुचित घटना घडू नये, म्हणून हा प्रतिबंधात्मक निर्णय घेण्यात आला आहे. पालकांनीही मुलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी- डॉ. पंकज आशिया, जिल्हाधिकारी, अहिल्यानगर.
पालकांसाठी टीप: शाळा लवकर सुटणार असल्यामुळे पालकांनी आपल्या पाल्यांना वेळेवर नेण्या-आणण्याची व्यवस्था करावी आणि सोबत पाण्याची बाटली (Water Bottle) व टोपी अवश्य द्यावी.
