गरीबांच्या स्वप्नावर डल्ला..! १० हजारांची लाच घेताना ग्रामसेविका आणि अभियंता एसीबीच्या जाळ्यात…
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-एकीकडे सरकार गरिबांना हक्काचे घर मिळावे म्हणून ‘प्रधानमंत्री आवास योजना’ राबवत असताना, दुसरीकडे याच योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी गरिबांच्या खिशावर डल्ला मारणाऱ्या दोन भ्रष्ट लोकसेवकांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) बेड्या ठोकल्या आहेत.खारेकर्जुने (ता.नगर) येथील एका तक्रारदाराच्या वडिलांचे नाव सन २०२३ मध्ये घरकुल योजनेसाठी नोंदवण्यात आले होते.२०२४ मध्ये ऑनलाईन यादीत नाव येऊन त्यांच्या खात्यात १५ हजार रुपयांचा पहिला हप्ता जमा झाला.मात्र,दुसऱ्या टप्प्याची मंजुरी मिळवून देण्यासाठी ग्रामसेविका पुष्पा डेरे आणि कंत्राटी अभियंता गौतम सूर्यवंशी यांनी अडवणूक सुरू केली.दुसऱ्या टप्प्याच्या मंजुरीसाठी या दोघांनी प्रत्येकी ५,००० रुपये अशा एकूण १०,००० रुपयांच्या लाचेची मागणी केली होती.तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी थेट लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात धाव घेतली.तक्रारीची शहानिशा केल्यानंतर,’एसीबी’ने सापळा रचला.सापळा कारवाई दरम्यान, तक्रारदार जेव्हा ग्रामसेविका पुष्पा डेरे यांच्याकडे पैसे देण्यासाठी गेले,तेव्हा त्यांनी ही रक्कम अभियंता सूर्यवंशी यांच्याकडे देण्यास सांगितले.
निमगाव घाना रोड परिसरात जसे तक्रारदाराने सूर्यवंशी यांना १०,००० रुपये सुपूर्द केले,तसेच दबा धरून बसलेल्या ‘एसीबी’च्या पथकाने झडप घालून सूर्यवंशी यांना रंगेहात अटक केली.एकाच वेळी ग्रामसेविका आणि अभियंता या दोघांवर कारवाई झाल्याने अहिल्यानगर जिल्हा परिषद आणि पंचायत समिती वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.गरिबांच्या योजनेतही मलिदा खाणाऱ्या अशा भ्रष्ट अधिकाऱ्यांचे धाबे आता दणाणले आहेत.”भ्रष्टाचार मुक्त महाराष्ट्र हेच आमचे ध्येय! जर तुमच्याकडे कोणीही कामासाठी लाचेची मागणी करत असेल, तर त्वरित लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधा.
