लग्नाच्या मांडवात रंगली इतिहासाची चळवळ..! ‘मराठा साम्राज्याचा नकाशा’ अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यासाठी सह्यांची मोहीम..
प्रतिनिधी:-लग्न म्हटलं की सनई-चौघडे,पाहुणे-रावळे आणि अक्षतांची उधळण डोळ्यासमोर येते. मात्र, शिवजन्मभूमी किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी असलेल्या बोरी खुर्द (ता.जुन्नर) येथे पार पडलेला एक शुभविवाह सोहळा सध्या संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय ठरला आहे.या विवाहप्रसंगी मराठा साम्राज्याचा देदीप्यमान इतिहास पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी ‘मराठा साम्राज्याचा नकाशा CBSE च्या आठवीच्या अभ्यासक्रमात पूर्ववत करावा’ या मागणीसाठी उपस्थित ७०० हून अधिक मान्यवरांच्या सह्यांची अनोखी मोहीम राबवण्यात आली.
विवाह सोहळा अन् सामाजिक बांधिलकी
शिवनेरी परिसरातील शेतकरी कुटुंबातील श्री. दिनकर गोविंद लोहकरे यांची सुकन्या चि.सौ.कां. अक्षदा आणि बिद्रेवाडी (ता.गडहिंग्लज,जि. कोल्हापूर) येथील श्री.जोतिबा टक्केकर यांचे सुपुत्र चि. अनिकेत यांचा शुभविवाह नुकताच संपन्न झाला.या आनंदोत्सवाचे औचित्य साधत, केवळ मंगल अष्टकांवर न थांबता आपल्या गौरवशाली इतिहासासाठी लढा देण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
मान्यवरांची उपस्थिती आणि स्वाक्षरी मोहीम
या अनोख्या उपक्रमाला राजकीय,सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील दिग्गजांनी आपला पाठिंबा दर्शवला.विवाह सोहळ्याला उपस्थित असलेल्या सुमारे ७०० मान्यवरांनी मागणीच्या पत्रावर आपल्या स्वाक्षऱ्या केल्या.कल्पनाताई वैभव शेठ काळे (सदस्य,पुणे जिल्हा परिषद),सुनंदाताई भागवत (माजी सदस्य, अहिल्यानगर जिल्हापरिषद),कारभारी पाटील आहेर (संचालक,खरेदी विक्री संघ, पारनेर),मंगेश कुऱ्हाडे (उपसरपंच,आळे),राहुल बाजीराव ढेंबरे पाटील (संस्थापक/प्रदेशाध्यक्ष, शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य) तसेच माऊली शेठ शेजवळ, भानुदास बस्ते,संभाजी दादा काळे,रामदास शेठ काळे,युवा नेते रोहन शेठ बेल्हेकर,हरीष कोकणे, तुकाराम भागवत आणि शिवप्रतिष्ठाण संघटनेचे हौशीराम मिंडे, शिवनाथ नाईकवाडी, सुरेश सहाणे, ओमकार गुंजाळ, गणेश श्रीराम यांच्यासह मोठ्या संख्येने नातेवाईक व ग्रामस्थ उपस्थित होते.
इतिहास पुसण्याचा प्रयत्न खपवून घेणार नाही!
याप्रसंगी मार्गदर्शन करताना मान्यवरांनी सीबीएसई (CBSE) बोर्डाच्या भूमिकेवर भाष्य केले. शिवप्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक प्रदेशाध्यक्ष राहुल बाजीराव ढेंबरे पाटील यांनी आवाहन केले की,“अखंड हिंदुस्थानच्या संकट काळात आपल्या पूर्वजांनी पानिपतच्या भूमीवर रक्त सांडले. ‘अहद तंजावर ते तहद पेशावर’ आणि ‘अटक ते कटक’ असा मराठ्यांचा विस्तीर्ण साम्राज्य विस्तार होता. हा जिवंत आणि ज्वलंत इतिहास पुढच्या पिढीला कळण्यासाठी अभ्यासक्रमात मराठा साम्राज्याचा नकाशा असणे अनिवार्य आहे.”कल्पनाताई काळे आणि सुनंदाताई भागवत यांनीही या उपक्रमाचे कौतुक करत, इतिहासाच्या संवर्धनासाठी अशा मोहिमा घराघरांत पोहोचणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन केले.लग्नासारख्या खाजगी कार्यक्रमात सामाजिक आणि ऐतिहासिक विषयावर जनजागृती केल्याबद्दल लोहकरे आणि टक्केकर परिवाराचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. ही स्वाक्षरी मोहीम आता केंद्र सरकार आणि शिक्षण मंडळापर्यंत पोहोचवण्याचा निर्धार ‘शिवप्रतिष्ठाण महाराष्ट्र राज्य’ संघटनेने व्यक्त केला आहे.
