श्रीगोंद्यात फुले-शाहू-आंबेडकर विचार मंचतर्फे प्रबोधनपर जयंती उत्सव तरुणांना परिवर्तनाचे आवाहन..’Gen Z’ पिढी व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीच्या जाळ्यात..महापुरुषांच्या विचारांची मशाल तेवत ठेवा DPI प्रदेशाध्यक्ष अजिंक्य चांदणे
श्रीगोंदा (प्रतिनिधी):-समता, स्वातंत्र्य,बंधुता आणि न्याय या घटनात्मक मूल्यांवर आधारित महापुरुषांचे विचार आपण अंगीकारले पाहिजेत.आज प्रबोधन कार्यक्रम रटाळ वाटत असले,तरी बुद्धीची भूक केवळ वाचन आणि विचारांतूनच पूर्ण होऊ शकते. तरुण पिढी सध्या ‘व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटी’मध्ये व्यस्त असून चळवळीपासून दूर जात आहे. तरुणांनी आपला मेंदू अपंग होऊ न देता शत्रू आणि मित्र ओळखायला शिकावे,” असे परखड मत DPI चे प्रदेशाध्यक्ष अजिंक्य चांदणे यांनी व्यक्त केले.श्रीगोंदा येथे फुले,शाहू, आंबेडकर विचार मंच आणि तालुक्यातील पुरोगामी संघटनांच्या वतीने आयोजित महात्मा फुले,डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि संत गाडगेबाबा संयुक्त जयंती उत्सवाच्या प्रबोधन कार्यक्रमात ते मुख्य मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
विचारांची जागा मनोरंजनाने घेतली;चिंतेचा विषय
आपल्या भाषणात चांदणे यांनी सध्याच्या बदलत्या परिस्थितीवर भाष्य केले.ते म्हणाले की, “सध्या महापुरुषांच्या जयंतीचे स्वरूप वैचारिक न राहता मनोरंजनाकडे झुकत आहे, ही चिंतेची बाब आहे. ‘Gen Z’ पिढीने आपल्या अस्मितेबाबत आणि इतिहासाबाबत जागरूक राहणे आवश्यक आहे. संविधान हा केवळ एका विशिष्ट समाजाचा ग्रंथ नाही,तर तो देशातील प्रत्येक मानवासह पशू-प्राण्यांचाही आधार आहे.चळवळीच्या इतिहासातील बलिदानाचा उल्लेख करताना चांदणे म्हणाले, “डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या काळापासून जयंती उत्सवांवर अनेकदा हल्ले झाले,मात्र निष्ठा आणि समर्पणामुळे अनुयायांनी हे कार्य थांबवले नाही.विद्यापीठ नामांतर लढ्यात पोचिराम कांबळे या मातंग समाजाच्या युवकाने दिलेले बलिदान विसरता येणार नाही.ते चळवळीतील पहिले मातंग शहीद ठरले.”
शिक्षण हेच प्रगतीचे साधन
महात्मा फुले आणि डॉ. आंबेडकरांच्या शैक्षणिक कार्यावर प्रकाश टाकताना त्यांनी सांगितले की, महात्मा फुलेंनी ‘विद्येविना मती गेली’ हा संदेश दिला, तोच वारसा पुढे नेत बाबासाहेबांनी अफाट विद्या आत्मसात केली. “शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे,” हा संदेश आजही तितकाच लागू असून महिलांनी महात्मा फुलेंचे कार्य समजून घेणे काळाची गरज आहे.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान गणेश फरताळे महाराज यांनी भूषवले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. ज्ञानदेव भोसले यांनी केले, तर सूत्रसंचालन ॲड. महेंद्र शिंदे यांनी केले.यावेळी विचारपीठावर ॲड.आरती शिरवाळे,सौ. भोसले मॅडम, भगवान आबा गोरखे, संजय लोंडके (DPI बीड जिल्हाध्यक्ष) उपस्थित होते. तसेच ॲड. संभाजी आप्पा बोरुडे, मुकुंद सोनटक्के (परिचय), राजेंद्र पोकळे, अनिल ठवाळ, कुणाल शिरवाळे, मनीषा घोडके यांच्यासह बहुसंख्य समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी तालुक्यातील विविध सामाजिक कार्यकर्ते व पत्रकारांनी विशेष परिश्रम घेतले. शेवटी नंदूभाऊ ससाने यांनी उपस्थितांचे आभार मानले.
