नगर–पुणे रोडवरील कायनेटिक चौकात मृत्यूचा सापळा..| जीवघेण्या अपघातांमुळे नगरसेवक मयूर बांगरे आणि नागरिकांमध्ये संतापाची लाट तीव्र आंदोलनाचा इशारा
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-अहिल्यानगर शहराचा महत्त्वाचा दुवा असलेल्या नगर–पुणे रोडवरील कायनेटिक चौक सध्या वाहनचालक आणि पादचाऱ्यांसाठी मृत्यूचा सापळा बनला आहे.दररोज दुपार आणि संध्याकाळच्या वेळी येथे होणारी प्रचंड वाहतूक कोंडी आणि वारंवार होणारे जीवघेणे अपघात यामुळे स्थानिक नागरिक व व्यापाऱ्यांमध्ये प्रशासना विरोधात तीव्र संताप निर्माण झाला आहे.याप्रकरणी आता पोलीस प्रशासनाला लेखी निवेदन देऊन तातडीने ठोस कारवाईची मागणी करण्यात आली आहे.कायनेटिक चौकातील परिस्थिती दिवसेंदिवस हाताबाहेर जात असून,त्याकडे वाहतूक शाखेचे पूर्णतः दुर्लक्ष होत असल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.वेगवान आणि अवजड वाहतूक:पुण्याकडून येणारी भरधाव वाहने आणि दौंड रोडकडून येणारे अवजड ट्रक यामुळे हा परिसर अत्यंत धोकादायक झाला आहे.नियोजनाचा अभाव:या ठिकाणी वाहतूक नियंत्रणासाठी कोणतेही प्रभावी नियोजन किंवा पोलीस कर्मचाऱ्यांची नियमित उपस्थिती नसल्याने गोंधळ उडत आहे.
जीवघेणे अपघात:यापूर्वी या चौकात अनेक निष्पाप नागरिकांना आपले प्राण गमवावे लागले आहेत.ज्येष्ठ नागरिक, महिला आणि शालेय मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.”उद्या पुन्हा एखादी दुर्दैवी घटना घडल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनावर राहील. वारंवार होणाऱ्या या त्रासामुळे आता संयम सुटत चालला आहे.”
नागरिकांच्या प्रमुख मागण्या:
१. कायनेटिक चौकात कायमस्वरूपी ट्रॅफिक सिग्नल यंत्रणा कार्यान्वित करावी.
२. वाहतूक नियंत्रणासाठी पोलीस कर्मचाऱ्यांची नियमित नियुक्ती करण्यात यावी.
३. वेग नियंत्रणासाठी स्पीड ब्रेकर आणि स्पष्ट संकेतचिन्हे तात्काळ बसवावीत.
४. हायवे प्राधिकरण,मनपा आणि PWD यांनी संयुक्त बैठक घेऊन दीर्घकालीन तोडगा काढावा.
प्रशासनाला इशारा
प्रशासनाने या निवेदनाची दखल घेऊन तातडीने कार्यवाही न केल्यास नगरसेवक मयूर बांगरे व स्थानिक नागरिकांनी तीव्र आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्याचा इशारा दिला आहे.कायनेटिक चौकातील ‘कॉकटेल’ ट्रॅफिकमुळे सर्वसामान्यांचा जीव टांगणीला लागला असून,आता पोलीस विभाग यावर काय पावले उचलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
