वन्यप्राण्यांची पाण्याची वणवण थांबली..! वन्यजीवांच्या रक्षणासाठी ‘प्रभाकरम’ फाउंडेशन सरसावले..
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-राज्यात उन्हाचा पारा चाळीशी पार गेल्याने निसर्गातील पाण्याचे स्रोत कोरडे पडू लागले आहेत.जंगलातील नैसर्गिक ओढे आणि झरे आटल्याने वन्यप्राण्यांची पाण्यासाठी भटकंती होत आहे. हीच गरज ओळखून प्रभाकरम फाउंडेशनने आपली सामाजिक बांधिलकी जपत चास येथील वनविभागाच्या पाणवठ्यांमध्ये टँकरद्वारे पाणी सोडले आहे.या उपक्रमामुळे परिसरातील बिबटे, हरणे,कोल्हे आणि विविध पक्ष्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.दरवर्षीप्रमाणे यंदाही उन्हाळ्याची तीव्रता वाढताच फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष वनक्षेत्राची पाहणी केली. पाण्याचे स्रोत आटल्याचे लक्षात येताच,तातडीने टँकरची व्यवस्था करून कृत्रिम पाणवठे भरण्यात आले. पाण्याअभावी वन्यप्राणी मानवी वसाहतींकडे वळण्याची शक्यता असते,ज्यामुळे मानव-वन्यजीव संघर्ष वाढतो.
हा संघर्ष टाळण्यासाठी आणि प्राण्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासातच पाणी उपलब्ध करून देण्यासाठी हा उपक्रम राबवण्यात आला.या मोहिमेत प्रभाकरम फाउंडेशनचे अध्यक्ष विपुल तापकीर,उपाध्यक्ष अभिषेक थोरात,सौरभ गावखरे यांच्यासह फाउंडेशनचे अन्य कार्यकर्ते सक्रिय सहभागी झाले होते.फाउंडेशनच्या या सातत्यपूर्ण कार्याचे निसर्गप्रेमी आणि ग्रामस्थांकडून मोठे कौतुक होत आहे.उन्हाळ्यात त्यांना पाण्यासाठी वणवण करावी लागू नये, हीच आमची भावना आहे. भविष्यातही आम्ही हा उपक्रम असाच सुरू ठेवणार आहोत.
