नाकाबंदीत ट्रॅफिक पोलिसांची मोठी कारवाई! ‘त्या’ गंभीर गुन्ह्यातील संशयित कार जप्त… पोलिसांच्या एका ‘क्लिक’ने उघडले भीषण गुन्ह्याचे रहस्य
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-शहरात वाढत्या गुन्हेगारीला लगाम घालण्यासाठी पोलीस प्रशासन सतर्क झाले असून,शहर वाहतूक शाखेने केलेल्या एका विशेष नाकाबंदी दरम्यान पुण्यातून पसार झालेली एक संशयास्पद कार पकडण्यात यश मिळवले आहे.पुणे शहर पोलीस दलातील एका गंभीर गुन्ह्यात सहभागी असलेले हे वाहन आता तांत्रिक तपासाअंती पुणे पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.दि.१५ एप्रिल २०२६ रोजी नीलक्रांती चौक येथे शहर वाहतूक शाखेतर्फे विशेष नाकाबंदी लावण्यात आली होती.

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या मोहिमेत सर्व वाहनांची कसून तपासणी केली जात होती. यावेळी एक संशयास्पद ‘ह्युंदाई व्हेरना’ (Hyundai Verna) कार थांबवण्यात आली.पोलिसांनी ई-चलन मशीनद्वारे वाहनाची तपासणी केली असता,यंत्रणेवर तातडीने ‘अलर्ट’ प्राप्त झाला.या अलर्टमुळे पोलिसांच्या भुवया उंचावल्या आणि त्यांनी तत्काळ वाहन ताब्यात घेऊन पुढील चौकशी सुरू केली.अहिल्यानगर पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे पुणे शहर पोलीस दलातील नांदेड सिटी पोलीस ठाण्याशी संपर्क साधला. चौकशीत असे निष्पन्न झाले की, ताब्यात घेतलेले वाहन (क्रमांक: MH-12-VV-5636) हे पुणे येथील एका गंभीर गुन्ह्याशी संबंधित आहे.भारतीय न्याय संहिता २०२३ मधील विविध कलमान्वये (उदा. कलम ३१८, ३१९,३३६,३४०) ३(५) या वाहनावर गुन्हा दाखल होता.ही कार पुण्यातून फरार झाली होती, जिचा शोध पुणे पोलीस घेत होते.अहिल्यानगर पोलिसांनी सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून,आज दि. ६ मे २०२६ रोजी सदर वाहन पुणे येथील नांदेड सिटी पोलीस ठाण्याच्या पथकाकडे सुपूर्द केले.
या कारवाईमुळे आंतरजिल्हा गुन्हेगारी टोळ्यांवर वचक बसण्यास मदत होणार आहे. सदरची यशस्वी कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक बाबासाहेब बोरसे, पोलीस उपनिरीक्षक शमूवेल गायकवाड,पोलीस उपनिरीक्षक मन्सूर शेख,अन्सार शेख,रामराव शिरसाट,खेडकर,जहीर शेख, उंडे,सतीश दळवी,खंडागळे, वार्डन इरफान शेख यांनी केली आहे.
