खाकी वर्दीतील माणुसकी..कोतवाली पोलिसांच्या सतर्कतेमुळे हरवलेला चिमुरडा सुखरूप पालकांच्या कुशीत…पाच तासांच्या अथक परिश्रमाला यश
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-पोलीस अधीक्षक श्री.मुम्मका सुदर्शन यांनी पदभार स्वीकारताच जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना सायंकाळच्या वेळी गर्दीच्या ठिकाणी पायी पेट्रोलिंग करण्याचे आदेश दिले आहेत.या आदेशाची अंमलबजावणी होत असतानाच, पहिल्याच दिवशी कोतवाली पोलिसांनी एका हरवलेल्या चिमुरड्याला त्याच्या पालकांपर्यंत पोहचवून खऱ्या अर्थाने ‘माणुसकीचे दर्शन’ घडवले आहे.दि.४ मे २०२६ रोजी सायंकाळी ६:३० वाजेच्या सुमारास कोतवाली पोलीस स्टेशनचे अधिकारी व अंमलदार कापड बाजारात पायी पेट्रोलिंग करत होते.यावेळी त्यांना एक सहा वर्षांचा मुलगा रडताना आढळून आला.पोलिसांनी प्रेमाने विचारपूस केली असता, घाबरलेल्या त्या बालकाला काहीही सांगता येत नव्हते. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षकांनी तातडीने सोशल मीडियाचा वापर करून मुलाचा फोटो व्हायरल केला आणि नातेवाईकांचा शोध घेण्यास सुरुवात केली.
अनोळखी मुलाच्या नातेवाईकांना शोधणे हे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. मात्र,पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेमुळे आणि पाच तासांच्या अथक परिश्रमानंतर त्या मुलाची ओळख पटली. ‘हमजा अजीम सय्यद’ (वय ५ वर्षे,रा.रामगड, श्रीरामपूर) असे या मुलाचे नाव असून,पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्याला त्याचे नातेवाईक अल्ताफ शेख यांच्या स्वाधीन केले.आपला हरवलेला मुलगा अचानक परत मिळाल्याने पालकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू आले आणि त्यांनी पोलिसांचे मनापासून आभार मानले.सदर कौतुकास्पद कामगिरी पोलीस अधीक्षक श्री.मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक श्री. वैभव कलुबर्मे,उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री.संभाजी गायकवाड,पोहेकाँ.भानुदास सोनवणे,पो.हे.कॉ.विजय ठोंबरे, पोहेकाँ.सुनील शिरसाट आणि पोकाँ दीपक रोहकले यांनी बजावली आहे.पोलिसांच्या या तत्परतेचे संपूर्ण अहिल्यानगर शहरात कौतुक होत आहे.
