भिंगारमध्ये पोलिसांची थरारक कारवाई..धारदार तलवारीसह एकाला ठोकल्या बेड्या..!
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-शहर आणि परिसरात गुन्हेगारी प्रवृत्तीवर वचक बसवण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली असून, भिंगार कॅम्प पोलिसांनी एका संशयिताला धारदार तलवारीसह रंगेहाथ पकडले आहे.या धडक कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.दि.४ मे २०२६ रोजी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर यांना एका गुप्त बातमीदारामार्फत खात्रीशीर माहिती मिळाली की,भुईकोट किल्ल्याजवळ सोलापूर रोडने एक तरुण हातात तलवार घेऊन जाणार आहे. माहिती मिळताच विलंब न करता मुलगीर यांनी तपास पथकाला तात्काळ कारवाईचे आदेश दिले.
मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी सोलापूर रोड परिसरात सापळा रचला.काही वेळातच एक तरुण हातात लोखंडी तलवार घेऊन येताना दिसला.पोलिसांची चाहूल लागताच त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला,परंतु सतर्क असलेल्या पोलीस अंमलदारांनी त्याला जागीच झडप घालून ताब्यात घेतले.पोलिसांनी पंचसमक्ष झडती घेतली असता त्याच्याकडे धारदार लोखंडी तलवार मिळून आली.विचारपूस केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली.त्याचे नाव उदय अब्राहम ढगे (वय २२, रा. शांतीनगर, केदारवस्ती) असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी कॅम्प पोलीस स्टेशनमध्ये आर्म ॲक्ट ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई ही धाडसी कारवाई पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन,अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ.दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा. पोलीस निरीक्षक जगदीश मुलगीर,पोलीस अंमलदार दीपक शिंदे,रवींद्र टकले,प्रमोद लहरे,कैलास शिरसाट यांच्या पथकाने यशस्वीरित्या पार पाडली.
