Politics..राहुरी विधानसभेवर कर्डिले ब्रँडचाच करिश्मा! भाजपाचे अक्षय कर्डिले यांचा १ लाख १२ हजारांच्या ऐतिहासिक मताधिक्याने ‘विराट’ विजय
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-राहुरी २२३ विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पक्षाने आपला बालेकिल्ला केवळ राखलाच नाही, तर विरोधकांचे अक्षरशः पाणी पाजले आहे. दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले यांचे चिरंजीव अक्षय कर्डिले यांनी तब्बल १ लाख १२ हजार ५८७ मतांच्या विक्रमी आघाडीने विजय मिळवत राहुरीच्या राजकारणात आपल्या नवीन पर्वाची दमदार सुरुवात केली आहे.

वडिलांचा वारसा आणि युवा नेतृत्वावर शिक्कामोर्तब
आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या या जागेसाठी भाजपने त्यांचे सुपुत्र अक्षय कर्डिले यांना रिंगणात उतरवले होते. ही निवडणूक अक्षय कर्डिले यांच्या राजकीय कारकिर्दीची पहिलीच परीक्षा होती. मात्र, राहुरीच्या जनतेने त्यांना भरभरून कौल देत कर्डिले कुटुंबावर असलेला विश्वास पुन्हा एकदा सिद्ध केला आहे.निवडणूक आयोगाच्या अधिकृत आकडेवारीनुसार, अक्षय कर्डिले यांनी सुरुवातीपासूनच मोठी आघाडी घेतली होती, जी शेवटच्या फेरीपर्यंत कायम राहिली.
