‘भारतीय बौद्ध महासभेतर्फे तथागत भगवान गौतम बुद्ध जयंती उत्साहात साजरी..’जगाला युद्धाची नाही, तर बुद्धाचीच गरज जिल्हाध्यक्ष राजेंद्र साळवे
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-“भगवान बुद्धांनी जगाला केवळ शांततेचा संदेश दिला नाही, तर करुणेचा महामंत्र दिला आहे. आजच्या संघर्षाच्या काळात संपूर्ण जगाला युद्धाची नाही, तर बुद्धाच्या विचारांची नितांत गरज आहे,” असे प्रतिपादन भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र साळवे यांनी केले.भारतीय बौद्ध महासभा, अहिल्यानगरच्या वतीने भगवान गौतम बुद्ध यांची २५७० वी जयंती सिद्धीबाग येथील सिद्धार्थ बुद्ध विहार येथे मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरी करण्यात आली. यावेळी समाजबांधवांची मोठी उपस्थिती लाभली होती.कार्यक्रमाची सुरुवात अतिशय मंगलमय वातावरणात झाली. प्रारंभी भगवान बुद्धांच्या मूर्तीला आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
त्यानंतर मेणबत्ती व अगरबत्ती प्रज्वलित करून सामुदायिकरीत्या त्रिसरण, पंचशील,बुद्धपूजा,भीमस्मरण, भीम-स्तुती व सूक्तपठण करण्यात आले. या पवित्र स्वरांनी संपूर्ण परिसर भारावून गेला होता.याप्रसंगी बोलताना जिल्हाध्यक्ष राजेंद्र साळवे म्हणाले की,बुद्धांची शिकवण ही शील,समाधी आणि प्रज्ञा या तीन मुख्य तत्त्वांवर आधारलेली आहे. जर समाजाने ही तत्त्वे आपल्या जीवनात अंगीकारली,तर मानवी जीवन खऱ्या अर्थाने समृद्ध होईल.बुद्धांचा धम्म हा केवळ एका विशिष्ट वर्गासाठी नसून तो संपूर्ण मानवजातीसाठी आणि सर्व जीवमात्रांसाठी मार्गदर्शक आहे.शहराध्यक्ष बौद्धाचार्य दीपक पाटोळे यांनी वैशाख पौर्णिमेचे महत्त्व अधोरेखित केले.भगवान बुद्धांचा जन्म, त्यांना झालेली ज्ञानप्राप्ती आणि त्यांचे महापरिनिर्वाण या तिन्ही ऐतिहासिक घटना एकाच दिवशी म्हणजेच वैशाख पौर्णिमेला झाल्याने या दिवसाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे, असे त्यांनी सांगितले.तसेच,सर्व जीवसृष्टीशी मैत्रीपूर्ण व्यवहार आणि प्रज्ञाधिष्ठित जीवन जगण्याचे आवाहन त्यांनी केले.महिला जिल्हाध्यक्ष सुनीताताई गायकवाड यांनी उपस्थित महिला व समाजबांधवांना बुद्ध पौर्णिमेच्या मंगलमय शुभेच्छा दिल्या.
या सोहळ्याला सचिव रवींद्र कांबळे, संघटक माधवराव चाबुकस्वार, संतोष कांबळे, विजय चाबुकस्वार, बौद्धाचार्य चिमाजी साळवे, राजेंद्र पाडळे, युवराज बनसोड, विजय पाटोळे, संजय डहाणे, राजेंद्र थोरात, संतोष जाधव, पोपटराव आरु सर, धम्मचारी अभयशील, संजयजी भिंगारदिवे, डॉ. भास्कर रणवरे, डॉ. शिरीष जाधव, वसंत पाटोळे, सुखदेव ताजणे, संगीताताई ताजने यांसह अनेक पदाधिकारी व उपासक-उपासिका मोठ्या संख्येने येत उपस्थित होत्या.कार्यक्रमाच्या शेवटी बौद्धाचार्य दीपक पाटोळे यांनी सूक्तपठण केले. त्यानंतर ‘सरनंतय’ गाथा घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थित समाजबांधवांनी एकमेकांना बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छा देऊन सुख-शांतीची कामना केली.
