अहिल्यानगरचा झेंडा सातासमुद्रापार..! पेमराज सारडा कॉलेजचा मा.विद्यार्थी कृष्णा शिंदेची युरोपमध्ये Ph.D. साठी निवड..३ लाखांच्या मानधनासह ‘ज्युनिअर रिसर्चर’ म्हणून नियुक्ती
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-नगरच्या मातीतील गुणवत्तेने पुन्हा एकदा जागतिक पटलावर आपला ठसा उमटवला आहे. येथील हिंदसेवा मंडळ संचलित पेमराज सारडा महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी कृष्णा संतराम शिंदे याने युरोपमधील नामांकित LUT University (फिनलंड) येथे Ph.D. साठी प्रवेश मिळवून जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. केवळ प्रवेशच नव्हे, तर कृष्णाची तिथे ‘ज्युनिअर रिसर्चर’ पदावरही निवड झाली असून, त्याला दरमहा सुमारे २.८ ते ३ लाख रुपये मानधन मिळणार आहे.युरोपमधील Ph.D. प्रवेशाची प्रक्रिया अत्यंत कठीण आणि स्पर्धात्मक असते. या जागेसाठी जगभरातून तब्बल २८५ संशोधकांनी अर्ज केले होते. यातून निवडक विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या. कृष्णाने आपल्या संशोधनाची दृष्टी, प्रयोगशाळेतील अनुभव आणि विषयांमधील सखोल ज्ञानाच्या जोरावर या जागतिक स्पर्धेत बाजी मारली.

कृष्णाने २०२३ मध्ये पेमराज सारडा महाविद्यालयातून रसायनशास्त्र (Chemistry) विषयात B.Sc. पूर्ण केले. यावेळी रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. रत्ना वाघमारे यांचे त्याला मोलाचे मार्गदर्शन लाभले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून त्याने भौतिक रसायनशास्त्र (Physical Chemistry) विषयात M.Sc. पदवी संपादन केली. त्याचे मुख्य संशोधन ‘फंक्शनल पॉलिमर्स’ आणि ‘अॅडव्हान्स्ड मटेरियल्स’ यावर आधारित आहे.कृष्णाने केवळ पदवी मिळवली नाही, तर संशोधनातही मोठे पाऊल उचलले आहे. MIT World Peace University येथे प्रोजेक्ट असिस्टंट म्हणून काम करताना त्याने आपले मार्गदर्शक डॉ. सुधीरकुमार शिंदे यांच्या सहकार्याने एक भारतीय पेटंट प्रकाशित केले आहे. तसेच, जगप्रसिद्ध RSC Applied Polymers या नियतकालिकात त्याचा शोधनिबंध प्रसिद्ध झाला असून ही कोणत्याही तरुण संशोधकासाठी गौरवास्पद बाब आहे.
कृष्णा येत्या ११ मे २०२६ रोजी फिनलंडकडे रवाना होणार आहे. तिथे तो प्रगत मटेरियल डिझाइन, सेन्सर तंत्रज्ञान आणि पर्यावरणीय निरीक्षणासाठी रसायनशास्त्राचा वापर या विषयांवर संशोधन करणार आहे.“कृष्णाची ही झेप आमच्या महाविद्यालयासाठी आणि संपूर्ण अहिल्यानगरसाठी अभिमानास्पद आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी जिद्द ठेवली तर ते जागतिक स्तरावर चमकू शकतात, हे त्याने सिद्ध केले आहे.”या यशाबद्दल कृष्णा शिंदे याचे सर्व स्तरातून कौतुक होत असून, त्याच्या या आंतरराष्ट्रीय भरारीमुळे नगरच्या शैक्षणिक वैभवात मोठी भर पडली आहे.
