शहरातील ‘त्या’ हायप्रोफाईल जुगार अड्ड्यावर मध्यरात्री पोलिसांचा छापा..२९ जुगारी पकडले..४.६७ लाखांचा मुद्देमाल जप्त!
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-शहराच्या मध्यवर्ती भागात अत्यंत गुप्तपणे सुरू असलेल्या एका मोठ्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी धाडसी कारवाई करत मोठी खळबळ उडवून दिली आहे.रेल्वेस्टेशन रोडवरील एका शेडमध्ये सुरू असलेल्या या ‘तीन पत्ती’ अड्ड्यावर छापा टाकून पोलिसांनी तब्बल २९ जुगाऱ्यांना रंगेहात पकडले असून, त्यांच्याकडून रोख रकमेसह लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.दि.७ मे २०२६ रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास जिल्हा पोलीस अधीक्षकांना खबऱ्यामार्फत माहिती मिळाली होती की, शक्कर चौक ते रेल्वेस्टेशन रोडच्या लगत असलेल्या एका पत्राशेडमध्ये मोठ्या प्रमाणावर जुगार सुरू आहे.या माहितीची गांभीर्याने दखल घेत,पोलीस अधीक्षकांनी तात्काळ कॅम्प पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी स.पो.नि.जगदीश मुलगीर यांना कारवाईचे आदेश दिले.

मिळालेल्या आदेशानुसार, स.पो.नि.मुलगीर यांनी आपल्या पथकासह (ज्यामध्ये पो.हे.कॉ.दिलीप शिंदे,नंदकुमार पठारे आणि पो.कॉ.प्रमोद लहारे यांचा समावेश होता घटनास्थळी अचानक छापा टाकला असता पोलिसांची एन्ट्री होताच जुगाऱ्यांची एकच पळापळ झाली,मात्र पोलिसांनी घेराव घालून २९ जणांना ताब्यात घेतले.तपासणी दरम्यान रोख रक्कम २,०३,०१०/- रुपये,मोबाईल फोन्स: २४ नग (विविध कंपन्यांचे),मोटारसायकल: ०६ नग एकूण किंमत: ४,६७,०१०/- रुपये जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे.या प्रकरणी पो.हे.कॉ.रवींद्र भास्कर टकले यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर ३६६/२०२६ नुसार महाराष्ट्र जुगार अधिनियम कलम १२(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनास्थळाचा पंचनामा करून सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.ही कारवाई पोलीस अधीक्षक श्री. मुम्मका सुदर्शन,अपर पोलीस अधीक्षक श्री.वैभव कलुबर्मे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी श्री.डॉ.दिलीप टिपरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.या पथकात स.पो.नि. जगदीश मुलगीर,दिलीप शिंदे, नंदकुमार पठारे,रवींद्र टकले, प्रमोद लहारे,आणि कोतवाली स्टेशनचे पो.स.ई.गणेश देशमुख यांचा समावेश होता.या गुन्ह्याचा पुढील तपास पो.हे.कॉ.भानुदास सोनवणे करत आहेत.शहराच्या मध्यवस्तीत झालेल्या या मोठ्या कारवाईमुळे अवैध धंदे करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
