प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराजांच्या मुलीच्या लग्नात डल्ला मारणारे ‘चेनस्नॅचर्स’ जेरबंद स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई..!
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-सुप्रसिद्ध कीर्तनकार निवृत्ती महाराज इंदोरीकर यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्यातील गर्दीचा फायदा घेऊन सोन्याचे दागिने चोरणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) पर्दाफाश केला आहे.या कारवाईत पोलिसांनी दोन सराईत गुन्हेगारांना बेड्या ठोकल्या असून त्यांच्याकडून सुमारे २,८९,५०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यानुसार (गु.र.नं. ३६२/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२)), इंदोरीकर महाराज यांच्या मुलीच्या लग्नानिमित्त आयोजित ध्वजारोहण कार्यक्रमात चोरट्यांनी फिर्यादीच्या गळ्यातील ६० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने बळजबरीने लंपास केले होते.या हाय-प्रोफाईल चोरीमुळे परिसरात खळबळ उडाली होती.

स्थानिक गुन्हे शाखेचे पथक या प्रकरणाचा समांतर तपास करत असताना,त्यांना गोपनीय माहिती मिळाली की,रेकॉर्डवरील गुन्हेगार सागर सुरेश कांबळे हा त्याच्या साथीदारासह चोरीच्या सोन्याची वाटणी करण्यासाठी ममदापूर फाटा येथे येणार आहे.या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला आणि संशयित मोटारसायकल अडवून दोघांना ताब्यात घेतले.सागर सुरेश कांबळे (वय ३२, रा. रमानगर,श्रीरामपूर),बबलु उर्फ अब्दुल इब्राहिम पिंजारी (वय ३६, रा. श्रीरामपूर) असे पकडलेले आरोपींचे नावे आहेत.चौकशीदरम्यान,त्यांनी आपले इतर साथीदार आतिक आयुब उर्फ आरीफ शेख आणि सनी विलास ढोकणे (दोन्ही रा. श्रीरामपूर) यांच्या मदतीने हा गुन्हा केल्याची कबुली दिली.हे दोन्ही साथीदार सध्या फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.११.५ ग्रॅम सोन्याचे दागिने (किंमत १,४९,५००/-) दोन मोबाईल फोन्स (किंमत ७०,०००/-) गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल (किंमत ७०,०००/-) एकूण मुद्देमाल: २,८९,५०० रुपये जप्त करण्यात आले आहे.
ताब्यातील आरोपी आणि मुद्देमाल पुढील तपासासाठी संगमनेर शहर पोलिसांच्या हवाली करण्यात आला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये चैनस्नॅचिंग किंवा अशा प्रकारच्या गुन्ह्यांची माहिती मिळाल्यास नागरिकांनी तात्काळ स्थानिक गुन्हे शाखा, अहिल्यानगर (फोन: ०२४१-२४१६१११) किंवा डायल ११२ वर संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
