पारनेरमध्ये मनसेचा ‘निर्धार’; आगामी निवडणुकांत ‘राज’ गर्जना करण्यासाठी कार्यकर्ते सज्ज..!सुपा येथील बैठकीत रणशिंग फुंकले जिल्हा संपर्कप्रमुख नयन कदम यांच्या उपस्थितीत कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य
सुपा (प्रतिनिधी): आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि सहकार क्षेत्रातील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने (मनसे) आपली कंबर कसली आहे. पारनेर तालुक्यातील सुपा येथे पार पडलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत, मनसेचा झेंडा फडकवण्याचा ठाम निर्धार जिल्हा संपर्कप्रमुख नयन कदम यांनी व्यक्त केला. या बैठकीमुळे पारनेर मनसेमध्ये नव्या ऊर्जेचे संचार झाले असून, तालुक्याच्या राजकीय समीकरणामध्ये मनसे आता महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
संघटनात्मक बांधणी आणि ‘राज’ रणनीती
जिल्हाध्यक्ष सचिन डफळ यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत पक्षाची आगामी भूमिका आणि रणनीतीवर सविस्तर चर्चा करण्यात आली. नयन कदम यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, “केवळ निवडणुका लढवणे हे आमचे ध्येय नसून, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मनसेची ताकद निर्माण करणे आणि सहकार क्षेत्रात सामान्य कार्यकर्त्यांना संधी देणे हे आमचे उद्दिष्ट आहे. तरुण आणि नव्या नेतृत्वाला संधी देऊन गावपातळीवर पक्ष विस्तार करणे ही काळाची गरज आहे.”तालुकाध्यक्ष अविनाश पवार यांना गावपातळीवर जनसंपर्क वाढवण्याच्या कडक सूचना यावेळी देण्यात आल्या.
प्रशासनाला सळो की पळो करून सोडू: अविनाश पवार
पारनेर तालुकाध्यक्ष अविनाश पवार यांनी आपली आक्रमक भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, “येणाऱ्या काळात पारनेर तालुक्यात मनसे एक ‘सक्षम विरोधी पक्ष’ म्हणून काम करेल. स्थानिक प्रश्नांवर केवळ चर्चा न करता, प्रशासनाला सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी भाग पाडले जाईल. निर्भीडपणे आवाज उठवून लोकांच्या समस्या सोडवण्यास आम्ही बांधील आहोत.”
सतीश म्हस्के: पारनेर तालुका खादी ग्रामोद्योग संघाच्या संचालकपदी निवड.,नारायण नरवडे: कडूज ग्रामपंचायत सदस्यपदी निवड,संपर्कप्रमुख नयन कदम यांनी या दोघांचाही सत्कार केला आणि अशा निवडींमुळे सहकार क्षेत्रात पक्षाची पकड मजबूत होईल,असा विश्वास व्यक्त केला.
इच्छुक उमेदवारांना साद
नयन कदम यांनी जाहीर केले की, आगामी पारनेर तालुका दूध संघ, कृषी उत्पन्न बाजार समिती, जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या सर्व निवडणुकांमध्ये मनसे आपले सक्षम उमेदवार रिंगणात उतरवेल. जे कार्यकर्ते निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत, त्यांच्या पाठीशी पक्ष ताकदीने उभा राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.या बैठकीला जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, जिल्हा उपाध्यक्ष महेंद्र गाडगे, पारनेर तालुकाध्यक्ष अविनाश पवार, तालुका सचिव नारायण नरवडे, तालुका उपाध्यक्ष वीरेंद्र थोरात, अक्षय सूर्यवंशी, बाबू भैया कोठावळे, सूरज गोरे, निकम गजरे, सतीश म्हस्के यांच्यासह मोठ्या संख्येने मनसैनिक आणि पदाधिकारी उपस्थित होते.
