प्रभाग १७ मध्ये पावसाळ्यापूर्वी तात्काळ व प्रभावी नालेसफाई करा..नगरसेवक मयुर बांगरे यांचे आयुक्तांना निवेदन..केवळ १-२ सफाई कर्मचाऱ्यांमुळे नालेसफाई अपुरी सीना नदीकाठच्या भागांत पूरपरिस्थितीचे सावट
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-अहिल्यानगर महानगरपालिका हद्दीतील प्रभाग क्रमांक १७ मध्ये मागील काही वर्षांपासून उद्भवणाऱ्या गंभीर पूरपरिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, प्रभागाचे नगरसेवक मयुर कन्हैयालाल बांगरे यांनी मनपा आयुक्तांना निवेदन देऊन पावसाळ्यापूर्वी तात्काळ आणि प्रभावी नालेसफाई करण्याची मागणी केली आहे.निवेदनात म्हटले आहे की,प्रभाग १७ मध्ये मागील ३-४ वर्षांपासून पावसाळ्यात गंभीर पूरस्थिती निर्माण होत असून,नागरिकांच्या घरात २ ते ३ फूट पाणी शिरते. यामुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागतो.

या प्रभागात केवळ १ ते २ सफाई कर्मचारी कार्यरत असल्यामुळे नालेसफाईचे काम अत्यंत अपुरे व ढिसाळ स्वरूपात होत आहे.ही परिस्थिती तात्काळ बदलणे अत्यावश्यक असून, संबंधित यंत्रणेस कठोर निर्देश देऊन पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात यावे.मल्हार चौक,रेल्वेस्टेशन परिसर,आदर्श गौतम नगर,रोहिदास वाडी,कायनेटिक चौक परिसर तसेच अरणगाव रोड परिसर (सुभद्रा नगर,समर्थ नगर, हनुमान नगर,इंदिरा नगर), केडगाव परिसर (नवीन विकासित भाग व जुने गाव) तसेच लोंढे मळा बायपास परिसर येथे मुख्य ओढे व अंतर्गत ड्रेनेज लाईनची तात्काळ व सखोल सफाई करणे अत्यंत गरजेचे आहे.नालेसफाई वेळेत व योग्य पद्धतीने न केल्यामुळेच दरवर्षी पूरस्थिती निर्माण होत असून,नागरिकांच्या जीवित व मालमत्तेला गंभीर धोका निर्माण होत आहे.म्हणूनच,पावसाळा सुरू होण्यापूर्वी तात्काळ सर्व संबंधित भागांमध्ये नालेसफाई पूर्ण करून आवश्यक ती प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात यावी,असे मयुर बांगरे यांनी निवेदनात नमूद केले आहे.
