रेसिडेन्शियल’ चा माजी विद्यार्थी बनला देशाचा ‘असिस्टंट कमांडंट’..! ‘जिल्हा मराठा’ विद्या प्रसारक समाज संस्थेकडून महेश जंजिरे यांचा विशेष सत्कार
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळवण्यासाठी चांगल्या भौतिक सुविधा किंवा मजबूत आर्थिक परिस्थिती असण्याची अजिबात गरज नाही. त्याऐवजी मनात जिद्द,चिकाटी आणि कठोर मेहनत करण्याची तयारी असेल,तर यश नक्कीच मिळते.ही त्रिसूत्रीच स्पर्धा परीक्षेचा खरा मंत्र आहे,” असे प्रतिपादन केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत (UPSC) केंद्रीय पोलिस दलात थेट असिस्टंट कमांडंट पदी नियुक्त झालेले महेश जंजिरे यांनी केले.अहमदनगर जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाज या जिल्ह्यातील अग्रगण्य शिक्षण संस्थेच्या ‘रेसिडेन्शियल हायस्कूल’चे माजी विद्यार्थी महेश ईश्वर जंजिरे यांची असिस्टंट कमांडंट पदी निवड झाली आहे.
खडतर प्रशिक्षण पूर्ण करून देशसेवेत रुजू होत असल्याबद्दल संस्थेच्या वतीने अध्यक्ष रामचंद्र दरे व सचिव ॲड.विश्वासराव आठरे पाटील यांच्या हस्ते जंजिरे यांचा एका विशेष समारंभात गौरव करण्यात आला.संस्थेचे अध्यक्ष रामचंद्र दरे व सचिव ॲड.विश्वासराव आठरे पाटील यांनी महेश जंजिरे यांच्या ‘युपीएससी’तील देदीप्यमान यशाचे कौतुक केले.ग्रामीण भागातील आणि प्रतिकूल परिस्थितीशी झगडत शिक्षण घेणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांसाठी महेश यांची ही यशोगाथा अत्यंत प्रेरणादायी आहे,अशा शब्दांत पदाधिकाऱ्यांनी जंजिरे यांचा गौरव केला.उपस्थितांशी संवाद साधताना महेश जंजिरे म्हणाले, “राज्य व देश पातळीवरील स्पर्धा परीक्षांमध्ये मराठी मुलांचा टक्का पूर्वी फारच कमी होता. आता तो वाढत असला तरी अपेक्षेएवढा नाही.अनेक विद्यार्थ्यांच्या मनात आर्थिक परिस्थितीबाबत न्यूनगंड असतो, पण तो चुकीचा आहे.योग्य दिशेने घेतलेले कष्ट कधीही वाया जात नाहीत.या सोहळ्याला संस्थेच्या खजिनदार ॲड.दीपलक्ष्मी म्हसे,सहसचिव मुकेश मुळे,कार्यकारिणी सदस्या अरुणा काळे,महेश यांचे वडील ईश्वर जंजिरे (बांधकाम व्यावसायिक),आई सुनीता जंजिरे (महिला बचत गट नेत्या), वास्तुविशारद पत्नी काजल जंजिरे,’रेसिडेन्शियल’चे प्राचार्य धनंजय म्हस्के,उपप्राचार्य दादासाहेब वांढेकर,संस्थेच्या शिवाजी सहकारी भांडाराचे अध्यक्ष प्रा.रवींद्र देवढे,शिक्षक नेते प्रा.डॉ.सुधाकर सुंबे यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी, प्राध्यापक,शिक्षक,पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य धनंजय म्हस्के यांनी केले, तर उपप्राचार्य वांढेकर व प्रा. देवढे यांनी आभार मानले.कार्यक्रमानंतर खाकी वर्दीतील रुबाबदार व्यक्तिमत्त्व असलेल्या महेश जंजिरे यांना रेसिडेन्शियल हायस्कूलच्या आवारात विद्यार्थी आणि पालकांनी अक्षरशःगराडा घातला.अनेकांनी त्यांच्यासोबत सेल्फी घेतले,हस्तांदोलन केले तर काहींनी स्वाक्षऱ्या घेतल्या.काही विद्यार्थ्यांनी थेट युपीएससीचा अभ्यासक्रम, अभ्यासाची पद्धत,वाचनाचे नियोजन आणि सामान्य ज्ञानाची तयारी कशी करावी,या प्रश्नांची सरबत्तीच महेश यांच्यावर केली. महेश जंजिरे यांनीही अत्यंत ओघवत्या आणि सोप्या भाषेत सर्वांचे शंकानिरसरन केले.”स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला मी सर्वतोपरी मदत व मार्गदर्शन करेन,” असे आश्वासनही त्यांनी यावेळी दिले.
