खाद्यपदार्थांच्या नावाखाली ‘स्लो पॉयझन..’? जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासनाचा थरारक छापा..आईस्क्रीम आणि खाद्यतेलाचा काळबाजार उघड..!
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-तुम्ही हौसेने खात असलेलं आईस्क्रीम आणि घरात वापरलं जाणारं खाद्यतेल सुरक्षित आहे का? की तुम्ही नकळत शरीरात विष टोचून घेताय? या भयंकर प्रश्नाने संपूर्ण जिल्हा हादरला आहे.जिल्ह्यात सुरू असलेल्या अन्न भेसळविरोधी मोहिमेत राहुरी आणि नेवासा तालुक्यात खळबळजनक कारवाया करण्यात आल्या आहेत.अन्न व औषध प्रशासनाने (FDA) ने तब्बल २ लाख ८४ हजार १८० रुपयांचा संशयास्पद आणि घातक साठा जप्त करत भेसळखोरांचे धाबे दणाणून सोडले आहेत.उन्हाळ्यात जिभेला तृप्त करणारं आईस्क्रीम तुमच्या आरोग्याचा गळा घोटू शकतं,याचा प्रत्यय राहुरीत आला.
राहुरीतील ‘शिवशक्ती आईस्क्रीम’ या कारखान्यावर प्रशासनाने अचानक धाड टाकली.तिथला अस्वच्छ आणि संशयास्पद कारभार पाहून अधिकारीही चक्रावले.दर्जाहीन आणि आरोग्याशी खेळणाऱ्या तब्बल १४८ पॅकेट्सचा साठा (किंमत ४१ हजार ४४० रुपये) जागेवरच जप्त करण्यात आला.दुसरी धडक कारवाई नेवासा तालुक्यातील कडू गल्लीत झाली. येथील संतोष किराणा स्टोअर्स मध्ये भेसळीचा काळा खेळ सुरू असल्याच्या संशयावरून छापा टाकण्यात आला.’एसबीजी’ ब्रँडचे रिफाइंड पामोलीन ऑईल,स्वयंपाकात सर्रास वापरल्या जाणाऱ्या या तेलाचा तब्बल १ हजार ४९८.४ किलो (जवळपास दीड टन) साठा जप्त करण्यात आला.या जप्त केलेल्या तेलाची किंमत २ लाख ४२ हजार ७४० रुपये आहे. हा साठा मानवी आरोग्यासाठी अत्यंत घातक असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.अन्न व औषध विभागाचे डॅशिंग आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या थेट आदेशाने आणि सहआयुक्त श्रीकांत करकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही ‘सर्जिकल स्ट्राईक’ करण्यात आली.अन्न सुरक्षा मानके कायदा २००६ च्या अंतर्गत अन्न सुरक्षा अधिकारी प्रदीप पवार,उ.र.पाटील आणि सहाय्यक आयुक्त अ.अ.भोईटे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.लोकांच्या ताटात थेट विष वाढणाऱ्या अशा भेसळखोरांना अजिबात माफी नाही.जिल्ह्यात ही मोहीम आणखी तीव्र केली जाईल.नागरिकांना कोणत्याही अन्नपदार्थाच्या दर्जाबाबत गंडवल्यासारखं वाटत असेल किंवा शंका असेल,तर त्यांनी थेट प्रशासनाशी संपर्क साधावा.”
— अ. अ. भोईटे (सहाय्यक आयुक्त,अन्न विभाग)
सावधान! बाजारातून अन्नपदार्थ खरेदी करताना डोळे उघडे ठेवा. भेसळखोरांचे हे रॅकेट तुमच्या घरात आजारपण पेरण्यासाठी टपून बसले आहे!
