अहमदनगर प्रतिनिधी(दि.२८ फेब्रुवारी):-अहमदनगर जिल्ह्यात पारनेर तालुक्यातील सुपा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षकाच्या मनमानी व त्रासाला कंटाळून त्यांच्या विरोधात सुपा ग्रामस्थ व परिसरातील नागरिकांनी, व्यवसायिकांनी थेट पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेतली.व सुपा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीनकुमार गोकावे यांच्याविषयीच्या तक्रारीचा पाढाच वाचला.तसेच त्यांच्या विरोधातील ग्रामपंचायती, व्यावसायिक तसेच काही सर्वसामान्य जनता यांच्या लेखी तक्रारीही दिल्या.यावर विखे पाटील यांनी थेट पोलीस अधीक्षकांना फोन लावून ग्रामस्थांच्या तक्रारींची चौकशी करुन योग्य तो निर्णय तातडीने घ्यावा,अशा सूचना दिल्या.तसेच सुपा येथील सरपंच असलेल्या मनिषा रोकडे यांचे पती सामाजिक कार्यकर्ते योगेश रोकडे व पोलीस निरीक्षक गोकावे यांच्यामधील वादावादीचा व्हीडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला होता.त्यानंतर सुपा व परिसरातील ग्रामस्थ, व्यावसायिक व परिसरातील सरपंच व नागरीकांनी थेट पालकमंत्री विखे यांची भेट घेऊन पोलीस निरीक्षकांना निलंबित करावे,या मागणीचे निवेदन दिले.यावेळी पालकमंत्री विखे यांनी सर्व घटनेची चौकशी करून कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले.
