संगमनेर प्रतिनिधी(दि.२८ फेब्रुवारी):-पुणे नाशिक महामार्गावर पिस्तुलाचा धाक दाखवून लूट करणारी व सशस्त्र दरोडा टाकणारी आंतरराज्यीय दरोडेखोरांच्या टोळीला जेरबंद करण्यात घारगाव पोलिसांना यश आले आहे. दरोडेखोरांकडून 2 लाख 89 हजार 550 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तर सदर आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना न्यायालयाने 3 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.परशुराम आप्पा मोरे (वय 22, रा. रेणुकानगर, शेवगांव, ता. शेवगांव, जि. अहमदनगर, मुळ रा. आंबेडकर चौक, मुरुड, लातुर), सचिन दगडु कासार (वय 21, रा. निवडुंगे, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर), सलमान अहमद पठाण (वय 19, रा. मराठी शाळेजवळ, पाथडी, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर), अनुराग मुकुंद असलकर (वय 20, रा. कसबा पेठ, पाथर्डी, ता. पाथर्डी, जि. अहमदनगर) अशी आरोपींची नावे आहेत.याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की,दि.25 फेब्रुवारी 2023 रोजी रात्री 10 वाजेच्या सुमारास माळवाडी,बोटा ता.संगमनेर शिवारात किशोर बाळकृष्ण राऊत (वय 37, धंदा खाजगी नोकरी, रा. प्लॅट नं 1, प्रथमेश अपार्टमेंट, समर्थनगर, वडाळा पाथर्डी रोड, नाशिक) हे त्यांच्या मोटारसायकलहून पुणे येथून नाशिककडे चालले होते. दरम्यान सहा इसमानी त्यांना अडवून त्यांना आमचे अंगावर का थुंकला म्हणुन लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन त्यांचा हात फ्रेक्चर केला.तसेच त्यांच्यावर गन पिस्टल रोखून त्यांच्याकडील पैशाचे पाकीट व त्यामध्ये एटीएम कार्ड,वाहनाचे रजिस्ट्रेशन स्मार्ट कार्ड, पॅन कार्ड,रोख रक्कम 600 रुपये, सी. बी. झेड मोटारसायकल नंबर एम. एच. 15 सी. डब्लू, 3682 असे बळजबरीने चोरुन नेले होते.याबाबत घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 92/2023 भारतीय दंड संहिता कलम 395, 397, 349 प्रमाणे दाखल करण्यात आला होता.सदर गुन्ह्याचा तपास करत असतांना घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांना गुप्त खबर्यामार्फत माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घारगांव परिसरामध्ये सापळा लावला.यामध्ये 5 संशयीत आरोपी ताब्यात घेण्यात आले.पोलिसांनी त्यांच्याकडे सखोल विचारपुस केल्यानंतर त्यांनी सदर वरील गुन्ह्याची कबुली दिली.पोलिसांनी आरोपींकडून 2 लाख 89 हजार 55 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. त्यामध्ये रोख रक्कम, एअर गन, लोखंडी धारदार कोयता, 2 मोटारसायकल, 8 मोबाईल, वेगवेगळ्या बँकेचे ए. टी. एम. कार्ड, गाडीचे रजि. स्मार्ट कार्ड, पॅन कार्ड असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.सदरची कार्यवाही जिल्हा पोलीस अधिक्षक राकेश ओला,अपर पोलीस अधिक्षक स्वाती भोर, श्रीरामपूर उपविभागीय पोलीस अधिक्षक संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके, घारगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष खेडकर,पोहेकॉ/कैलास देशमुख,पोहेकॉ/गणेश लोंढे, पोना /संतोष खेरे,पोना/ किशोर लाड,पोशि/हरिश्चंद्र वांडे,पोशि/अनिल भांगरे,म पोशि/वर्षा शिंदे यांनी केली आहे.
