गुप्त माहिती मिळाली अन् एलसीबीने ठोकल्या बेड्या;एक तीन वर्षापासून फरार तर दुसरा खुनाचा प्रयत्न करणारा..त्या सराईत गुन्हेगारांचा आता पोलीस कोठडीत मुक्काम..!
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-श्रीरामपूर शहर आणि तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत गंभीर गुन्हे करून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या दोन अट्टल फरार आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने अत्यंत शिताफीने जाळ्यात पकडले आहे.यात खुनाचा प्रयत्न करणाऱ्या एका संशयितासह,गेल्या ३ वर्षांपासून फरार असलेल्या सराईत चोराचा समावेश आहे.जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री.मुम्मका सुदर्शन यांनी जिल्ह्यातील फरार आरोपींना शोधून तात्काळ अटक करण्याचे कडक आदेश दिले होते.या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री.संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली पो.उप.नि.विकास जाधव, फुरकान शेख,रिचर्ड गायकवाड,शामसुंदर जाधव, रमीझराजा आतार,भगवान थोरात,प्रशांत राठोड आणि चालक भगवान धुळे यांच्या पथकाने श्रीरामपूर परिसरात शोध मोहीम सुरू केली.श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात दाखल ‘खुनाचा प्रयत्न’ (BNS कलम १०९ व आर्म ॲक्ट ३/२५) प्रकरणातील फरार आरोपी संदेश संजय हराळ (वय २३, रा.शिरसगाव,ता.श्रीरामपूर) हा नेवासा रोडवरील रिलायन्स पेट्रोल पंपाजवळ येणार असल्याची गुप्त बातमी पोलिसांना मिळाली.गुप्त बातमीदार आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पथकाने तात्काळ सापळा रचून संदेश हराळ याला ताब्यात घेतले. चौकशी दरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.
तसेच श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात २०२३ मध्ये दाखल चोरीच्या गुन्ह्यातील (भादंवि ३७९) फरार आरोपी अजय छगन बर्डे (वय २५,रा. मालुंजा,ता.श्रीरामपूर) हा मालुंजा बाजारतळ परिसरात संशयितरीत्या फिरताना पथकाला मिळून आला.त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता,त्याने चोरीच्या गुन्ह्याची कबुली दिली.हा आरोपी गेल्या ३ वर्षांपासून पोलिसांना चकवा देत फरार होता.स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाईनंतर आरोपी संदेश हराळ यास श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन,तर अजय बर्डे यास पुढील तपासासाठी श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशनच्या स्वाधीन केले आहे.हि कारवाई पोलीस अधीक्षक श्री.मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेने केलेल्या या धडक कारवाईमुळे गुन्हेगारांचे धाबे दणाणले असून नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
