अहिल्यानगरमध्ये अनैतिक देहव्यवसाया प्रकरणी प्रशासनाचा मोठा निर्णय..
अहिल्यानगर (प्रतिनिधी):-श्रीगोंदा तालुक्यातील हॉटेल आणि लॉजच्या नावाखाली सर्रास सुरू असलेल्या अनैतिक देहव्यवसायाचा पर्दाफाश झाल्यानंतर प्रशासनाने अत्यंत कठोर पाऊल उचलले आहे. काष्टी येथील ‘हॉटेल आम्रपाली लॉज अँड बार’ आणि बनपिंप्री येथील ‘हॉटेल सुप्रिम’ या दोन आस्थापना अनैतिक व्यापार (प्रतिबंध) अधिनियम, १९५६ च्या कलम १८ अन्वये तात्काळ प्रभावानी बंद करण्याचे (सील करण्याचे) आदेश उपविभागीय दंडाधिकारी श्रीकुमार चिंचकर यांनी दिले आहेत.प्रशासनाच्या या धडक कारवाईमुळे बेकायदेशीर व्यवसाय चालवणाऱ्यांचे आणि हॉटेल चालकांचे धाबे दणाणले आहेत.अहिल्यानगर ते दौंड मार्गावरील काष्टी येथील ‘हॉटेल आम्रपाली लॉज अँड बार’मध्ये मालक आणि चालकाकडून परराज्यातून व इतर जिल्ह्यांतून महिलांना बोलावून देहव्यवसाय करवून घेतला जात असल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले होते.तसेच अहिल्यानगर–सोलापूर मार्गावरील बनपिंप्री येथील ‘हॉटेल सुप्रिम’मध्ये आसाम, गुजरात आणि महाराष्ट्रातील ७ महिलांना पैशांचे आमिष दाखवून आणण्यात आले होते.
तेथे पुरुष ग्राहकांकडून पैसे घेऊन महिलांमार्फत देहव्यापार चालवला जात होता.उपविभागीय दंडाधिकारी श्रीकुमार चिंचकर यांनी श्रीगोंदा पोलीस निरीक्षकांना या आदेशाची तात्काळ अंमलबजावणी करून अनुपालन अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.”भविष्यात या जागांचा वापर पुन्हा अनैतिक व्यापार किंवा कुंटणखान्यासाठी झाल्यास, त्याची सर्वस्वी कायदेशीर जबाबदारी मूळ जमीन आणि घरमालकाची राहील,” असा थेट आणि कडक इशाराही प्रशासनाने या आदेशाद्वारे दिला आहे.
