कर्तव्य बजावत असताना झालेल्या प्राणघातक हल्ल्यात मनपा कर्मचारी धीरजसिंग परदेशींचा उपचारादरम्यान दुर्दैवी अंत
महाराष्ट्र न्यूज 24 (अहिल्यानगर):-मुकुंदनगर परिसरात पथदिव्यांच्या दुरुस्तीचे कर्तव्य बजावताना महापालिकेच्या कंत्राटदार संस्थेचे कर्मचारी धीरजसिंग परदेशी यांच्यावर झालेला प्राणघातक हल्ला अखेर जीवघेणा ठरला आहे. उपचारादरम्यान धीरजसिंग यांची प्राणज्योत मालवल्याची धक्कादायक बातमी समोर आली असून,या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण अहिल्यानगर शहरात तीव्र संताप आणि खळबळ उडाली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, जुन्या वादातून ही हिंसक घटना घडल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.
या घटनेचे तीव्र पडसाद उमटले असून महापालिकेने खबरदारीचा उपाय म्हणून परिसरातील सर्व सार्वजनिक सेवा तात्पुरत्या स्वरूपात बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.दरम्यान,घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस प्रशासनाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून काही संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
