प्रतिनिधी (दि.४ मार्च):-कोरोना काळात लावण्यात आलेल्या निर्बंधाचे उल्लंघन करणाऱ्या लोकांकडून दंड वसूल करण्यासाठी जालना नगर पालिकेच्या अधिपत्याखाली पोलिसांचा समावेश असलेली पथके शहरात तैनात करण्यात आली होती.या पथकात नगर पालिका कर्मचारी,पोलीस, शिक्षक आणि अन्य सरकारी कर्मचाऱ्यांचा समावेश होता.विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांना दंड करण्यासाठी जालना पालिकेनं या पथकातील कर्मचाऱ्यांना पावती पुस्तके दिली होती. पालिकेतील लिपिक संतोष अग्निहोत्री याच्या मार्फत ३९५ पावती पुस्तके पथकाला देण्यात आली होती.१५ जुलै २०२० ते ३० एप्रिल २०२२ या काळात ३९५ पावती पुस्तकांपैकी ३४७ पावती पुस्तके जमा झाली होती.तर तब्बल ४८ पावती पुस्तके अद्यापही गायबच आहेत.पालिकेत जमा झालेल्या ३४७ पावती पुस्तकानुसार ४२ लाख ७२ हजार ४४० रुपये दंड वसूल झाल्याचे दिसत आहे.मात्र, त्यापैकी संतोष अग्निहोत्री याने केवळ २२ लाख ४० हजार रुपयेच जालना पालिकेच्या रोखपालाकडे जमा केली आहे.त्यामुळे तब्बल १८ लाख ३२ हजार ४४० रुपयांचा अपहार केल्याचे स्पष्ट होत आहे.तसेच चौकशीमध्ये ४८ पुस्तके गायब केल्याचे आणि ३ पावती पुस्तके बनावट छापल्याचे स्पष्ट झाले आहे.दरम्यान,जालना पालिकेचे उपमुख्याधिकारी महेश शिंदे यांनी आज यासंदर्भात फिर्याद दिली असून,लिपिक संतोष अग्निहोत्री याच्याविरुद्ध कदीम जालना पोलीस ठाण्यात कलम ४०८,४०९, ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
