अहमदनगर प्रतिनिधी(दि.४ मार्च):-आधार कार्ड बँक खात्याला लिंक करायचे आहे, त्यासाठी मोबाईलवर पाठवलेली लिंक ओपन करून त्यावर माहिती भरा, असा एक बनावट फोन एका व्यवसायिकाला एचडीएफसी बँकेच्या नावे आला.त्या फोनवरून बोलणार्या व्यक्तीने सांगितल्याप्रमाणे व्यवसायिकाने लिंक ओपन करून माहिती भरली असता त्यांच्या पत्नीच्या बँक खात्यातून एकुण तीन लाख 99 हजार 500 रूपये कपात झाले. संजय माधवदास गुजराथी (वय 60 रा.रमादेवी मंदिरामागे, भुतकरवाडी, सावेडी) असे फसवणुक झालेल्या व्यवसायिकाचे नाव आहे.ही घटना शुक्रवारी दि.३ मार्च रोजी सकाळी घडली असून गुजराथी यांनी लगेच तोफखाना पोलीस ठाणे गाठून यासंदर्भात फिर्याद दिली आहे.पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.संजय गुजराथी यांचे लक्ष्मीकारांजा चौक,या ठिकाणी सुयश इलेक्ट्रीकल या नावाचे दुकान आहे.त्यांची पत्नी संगिता यांच्या नावाने एचडीएफसी बँक,शाखा लालटाकी रोड, नगर येथे बचत खाते आहे. शुक्रवारी सकाळी साडे आठ वाजता फिर्यादी घरी असताना त्यांना त्यांच्या मोबाईलवर एका अनोळखी मोबाईल क्रमांकावरून फोन आला व सदर अनोळखी व्यक्ति फिर्यादीला म्हणाली की,‘मी एचडीएफसी बँकेतुन बोलत आहे,तुमचे आधार कार्ड तुमच्या खात्याला लिंक करायचे आहे.मी तुमच्या मोबाईलवर एक लिंक पाठवतो तुम्ही ती लिंक ओपन करून त्यामध्ये तुमची माहिती भरा,’ असे सांगुन त्याने फिर्यादीला फोनवर लिंक पाठविल्याने त्यांनी ती लिंक ओपन करून त्यामध्ये बँकेचा कस्टमर आयडी व पासवर्ड टाकला असता त्यांच्या पत्नीच्या नावे असलेल्या एचडीएफसी या बँकेच्या खात्यातून एक लाख,99 हजार 500 आणि एक लाख असे एकुण तीन लाख 99 हजार 500 रूपये विड्रोल झाल्याचा मेसेज आला.दरम्यान फिर्यादीने त्यानंतर तात्काळ त्या मोबाईल क्रमांकावर फोन लावला,परंतु त्याने फिर्यादीचा फोन घेतला नाही.त्यामुळे फिर्यादीची खात्री झाली की,कोणीतरी अज्ञात इसमाने फोन करून बँक अधिकारी असल्याचे सांगुन विश्वास संपादीत करून त्यांच्या पत्नीच्या नावे असलेल्या एचडीएफसी बँक खात्यातून तीन लाख, 99 हजार 500 रक्कम काढून घेतले आहे.अधिक तपास पोलीस करीत आहेत.
