भेसळयुक्त दूध व त्यासाठीचे घातक असलेले रसायन आढळून आल्याने राहुरी तालुक्यात एकच खळबळ; अन्न औषध प्रशासनाने मारला छापा
राहुरी प्रतिनिधी (दि.१२ मार्च):-राहुरी तालुक्यातील तांदूळवाडी शिवारात अन्न व औषध प्रशासनाने टाकलेल्या छाप्यात भेसळयुक्त दूध व त्यासाठीचे घातक असलेले रसायन आढळून आल्याने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.अन्न औषध प्रशासनाला मिळालेल्या खबरीवरून पथकाने दि.१० मार्च रोजी सकाळीच तांदूळवाडी शिवारात मांजरी रोडवर टाकलेल्या छाप्यात संशयास्पद वस्तू रसायन तसेच भेसळयुक्त दूध आढळून आले होते.याबाबत दिवसभर नमुने घेत पंचनामा करण्यात आला.औषध प्रशासनाने दोन स्वतंत्र फिर्यादी दिल्या आहेत.पहिली फिर्याद अन्नसुरक्षा अधिकारी प्रदीप कुटे यांनी संदीप सूर्यभान म्हसे याच्या विरुद्ध दिली आहे.यात व्हे पावडर (स्टिंग्ड डिगिनरलाईज्ड डी.एम. ४०) २३ किलो डेअरी पडगियर कुटे पावडर २३ किलो लाइट लिक्विड पॅराफिन एच जी ११८ लिटर कृत्रिम दूध ३८ लिटर व गाय दूध ३८ लिटर आढळून आल्याचे म्हटले आहे.दुसरी फिर्याद अन्नसुरक्षा अधिकारी प्रदीप पवार यांनी नवनाथ खाटेकर याच्या विरुद्ध दिली आहे.त्यात व्हे पावडर (स्टिंग्ड स्प्रेड्राईड आर के छाप (अंदाजे किंमत ४२,००० हजार) आढळल्याचे म्हटले आहे.औषध प्रशासनाच्या कारवाईनंतर उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीरामपूर विभाग संदीप मिटके,पोलिस निरीक्षक मेघशाम डांगे, उपनिरीक्षक खोंडे,आदींनी भेट देऊन माहिती घेतली.