धक्कादायक…हार्वेस्टर खाली चिरडून शेतकऱ्याचा मृत्यू
श्रीगोंदा प्रतिनिधी (दि.१६ मार्च):-अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात एक नुकतीच धक्कादायक घटना घडली आहे.हार्वेस्टरमध्ये बसून स्वतःच्या शेतात गहू करण्यासाठी जात असताना हार्वेस्टरचे ब्रेक फेल झाल्याने व ऑपरेटरचे नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात मांडवगण (ता.श्रीगोंदा) येथील शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.बबन शंकर बोरुडे (वय ७०) असे मयत शेतकऱ्याचे नाव आहे.सध्या जिल्ह्यात सर्वत्र अवकाळी पावसाचे वातावरण असल्याने शेतातील गहू करण्यासाठी बबन शंकर बोरुडे हार्वेस्टरच्या शोधात होते.त्यांना एक हार्वेस्टर मिळाले.हार्वेस्टर घेऊन थाप्याचा खंडोबा शिवारातील शेताकडे ते चालले होते.त्या हार्वेस्टरमध्ये ते बसले होते. तिकडे जात असताना राळेगण म्हसोबा हद्दीतील सखूबाई मंदिरापासून थाप्याच्या खंडोबाकडे वळणाऱ्या हार्वेस्टरचे ब्रेक फेल झाले.त्यामुळे हार्वेस्टर राळेगणच्या दिशेने उताराने वेगाने जाऊ लागले. ऑपरेटरने प्रसंगावधान राखून हार्वेस्टर एका बाजूला वळविला.परंतु,हार्वेस्टरमध्ये बसलेले शेतकरी बोरुडे हे खाली पडले व हार्वेस्टरखाली चिरडले गेले.त्यांचा जागीच मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच लोकांनी घटनास्थळी धाव घेतली.