Maharashtra247

आत्मनिर्भर भारत निर्माण करण्यासाठी अशा एक्स्पोची गरज-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे;शिर्डी येथील नियोजित थीम पार्क साठी निधीची कुठलीही कमतरता पडू देणार नाही मुख्यमंत्री

 

शिर्डी प्रतिनिधी(दि.२६ मार्च):-पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील आत्मनिर्भर भारत निर्माण करण्यासाठी अशा महा एक्स्पो ची गरज आहे,अशा महा एक्स्पो मधूनच शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शेती करणे,पशुपालन करणे एवढेच नाही तर शेती पूरक व्यवसाय करणे याची सविस्तर माहिती मिळते असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगून राज्याचे आणि केंद्राचे सरकार हे वेळोवेळी शेतकऱ्यांना अशा प्रकारचे व्यासपीठ उपलब्ध करून देते असे सांगितले.शिर्डी येथे आयोजित महापशुधन एक्स्पोचा समारोप प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन,महसूल मंत्री राधकृष्ण विखे पाटील, आमदार बबराव पाचपुते,जयकुमार गोरे, मोनिका राजळे,राहुल कुल, माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील,डीसीसी बँकेचे अध्यक्ष शिवाजीराव कर्डिले, यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना ते म्हणाले की राज्यात आता शेतकरी, कष्टकरी,सर्वसामान्याचे सरकार आले आहे.त्यामुळे कुठली आपत्ती असो अथवा कुठली अडचण हे सरकार त्यांच्या पाठीशी कायम आहे. राज्यात सत्तांतर झाले आणि मागील सहा महिन्यांत अनेक योजना ह्या जाहीर केल्या.या वेळी अर्थसंकल्पात पंचामृत अर्थसंकल्प सादर केला. यातून समाजाच्या सर्व स्तरातील लोकांना न्याय देण्याचे काम केले असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. शिर्डी येथील नियोजित थीम पार्क साठी निधीची कुठलीही कमतरता पडू देणार नाही असा शब्द यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला. ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी यावेळी बोलताना सांगितले की अहमदनगर जिल्हयात सहकाराची पाळेमुळे फार पूर्वी रुजविले असल्याने या भागात सहकार क्षेत्रात चांगले काम झाले आहे.त्यामुळे या भागातील शेतकऱ्याकडे हा खऱ्या अर्थाने सुबत्ता नांदते. शैक्षणिक,सहकार,बँकिंग,या सारख्या क्षेत्रात हा जिल्हा अग्रेसर आहे.अशा या जिल्ह्यात असे महापशू प्रदर्शन भरविले जाते हे या भागातील शेतकऱ्यांसाठी एक पर्वणीच आहे.नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी यावेळी आपल्या भाषणातून अशा महा एक्स्पो तून शेतकरी तसेच पशू पालकांना पशू संवर्धन कशा पद्धतीने केले जाते याची शास्त्रीय दृष्टीने प्रात्यक्षिकासह माहिती दिली जाते असे सांगून शेतकऱ्यांनी शेतीला जोड धंदा हा सुरू करणे गरजेचे असल्याचे सांगितले. लम्पि आजारात आपल्या राज्याने प्रभावी काम केले असून संपूर्ण राज्यात आपण पशूंचे मोफत लसीकरण केले. देशातील एकमेव आपले राज्य आहे ज्यांनी असे काम केले. महा एक्स्पो आयोजित करण्या मागचा हाच मूळ उद्देश देशी वाणाचे संवर्धन व्हावे त्याच बरोबर त्यावर संशोधन व्हावे हा असून या एक्सपोतून तो संपूर्ण झाला असल्याचे नामदार विखे पाटील यांनी सांगितले.प्रास्ताविक करताना खा.डॉ.सुजय विखे पाटील म्हणाले की १२ राज्यातील अकरा जातीचे २२ प्रजातीचे साडे आठशे पशू तसेच पक्षी या महा एक्स्पो साठी सहभागी झाले होते.यावेळी पशुपालकांनी आपला सहभाग नोंदवून हे खऱ्या अर्थाने प्रदर्शन यशस्वी केले.या महा एक्स्पोत सर्वोत्कृष्ट पशू,पक्षी याची या निमित्ताने निवड देखील केली. परराज्यातून आलेले पशू तसेच पक्षी हे बघून नागरिकांना काही तरी नवीन बघण्यात आनंद वाटत होता. शालेय, महाविद्यालयीन विद्या्थ्यांनी देखील या पशू प्रदर्शनचा आनंद घेतला.या कार्यक्रमास पशुपालक , शेतकरी, तसेच परिसरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

You cannot copy content of this page