प्रतिनिधी(दि.३० मार्च):-संगमनेर तालुक्यातील कोल्हार घोटी राज्य महामार्गावर समनापूर गावातील मश्चिद जवळ ट्रकने दुचाकी स्वाराला जोराची धडक दिल्याने अपघाताची घटना घडली.या अपघातात वडगावपान येथील कॉलेजचा तरूण जागीच ठार झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.याबाबत अधिक माहिती अशी की,संगमनेर येथील श्रमिक महाविद्यालयाचा विद्यार्थी अनिकेत संजय गडगे हा कॉलेज तरुण आपल्या अॅक्टीव्हा गाडी (नंबर एम. एच.17.बी.सी.390) वरून वडगावपान येथे आपल्या घरी जात असताना समनापूर गावाजवळ मळी भरलेला टँकर (एम.एच.12.एच.डी. 7222) या मालट्रकने जोराची धडक दिल्याने कुमार अनिकेत संजय गडगे वय अंदाजे 16 ते 17 हा 11 वीत शिकणारा विद्यार्थी मालट्रकचे चाक डोक्यावरून गेल्याने जागीच ठार झाला.या घटनेची माहिती शहर पोलीस स्टेशनला देण्यात आली.शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे व अन्य सहकारी यांनी घटनास्थळी दाखल होऊन रस्त्यावरील वाहने बाजुला केली.वाहतुक सुरळीत केली. मालट्रकच्या ड्रायव्हरला ताब्यात घेण्यात आले असून पुढील तपास पोलीस करत आहेत.अनिकेत गडगे याचे अपघाती मृत्युमुळे वडगाव पान व समनापूर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
