शहरात रामनवमी मोठ्या उत्साहात साजरी
अहमदनगर प्रतिनिधी (दि.३१ मार्च):-अहमदनगर शहरात सकल हिंदू समजाच्या वतीने श्रीराम नवमी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.दांडपट्ट्याचं प्रदर्शन या मिरवणुकीचा प्रमुख आकर्षण होते.नगर शहराच्या विविध भागातून काढण्यात आलेल्या मिरवणुकांमध्ये श्रीरामाच्या जयघोषाने व भगव्या झेंड्यांमुळे संपूर्ण अहमदनगर शहर भगवेमय झाले होते. आज काढण्यात आलेल्या मिरवणुकीमध्ये लेझीम पथक,ढोल पथक,मैदानी खेळाचे प्रात्यक्षिक तसेच डीजेच्या तालावर तरुणाई चांगलीच थिरकल्याचं यावेळी पाहायला मिळाली,मिरवणुकीत सहभागी झालेल्या हजारो राम भक्तांनी शांततेच्या मार्गाने मिरवणुकीत सहभाग घेतला होता.या मिरवणुकीत वेगवेगळ्या घोषणाचे फलक देखील पाहायला मिळाले. अहमदनगर शहरात सध्या नामांतराचा मुद्दा चर्चेत आहे त्याचे देखील प्रतिबिंब या मिरवणुकीत उपस्थितांकडून पाहायला मिळाले.रामनवमीच्या या मिरवणुकीत भगव्या पताका आणि भगव्या झेंड्यासह भारताचा राष्ट्रीय ध्वज तिरंगा देखील दिसून आला.अलिकडच्या काळात जिल्ह्यात दोन समाजांमध्ये धार्मिक तेढ निर्माण होत असल्याचे प्रकारात मोठी वाढ झाली आहे.याच पार्श्वभूमीवर जिल्हा पोलीस दल सतर्क झाले आहे.आज ठिकठिकाणी साजरा होत असलेल्या श्रीराम नवमी उत्सवात कोणताही गैरप्रकार होऊ नये,यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस दलाकडून विशेष काळजी घेतली जात आहे. खास करून सोशल मीडियावर पोलिसांचा ‘वॉच’ आहे.यासाठी सायबर पोलिसांचे स्वतंत्र पथक देखील काम करत आहे.तसेच मिरवणूकीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मिरवणूक संपेपर्यंत स्वतःजिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला रात्री उशिरापर्यंत उपस्थित होते.यावेळी तोफखाना पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मधुकर साळवे तसेच कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्यासह पोलिस स्टेशनचे कर्मचारी उपस्थित होते.