शिर्डी प्रतिनिधी(दि.२ एप्रिल):-धिरेंद्र कृष्ण शास्त्रींनी श्री.साईबाबांच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याचा महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तिव्र शब्दात निषेध केला आहे.धर्माचा काय प्रचार करायचा तो जरुर करा परंतू दुस-याचा अवमान करण्याचा आधिकार तुम्हाला नाही अशा शब्दात त्यांनी माध्यमांशी बोलताना धिरेंद्र कृष्ण शास्त्रींना खडेबोल सुनावले.या वादग्रस्त विधानावर आपली भावना व्यक्त करताना मंत्री विखे पाटील म्हणाले की,धिरेंद्र कृष्ण शास्त्रींकडून यापुर्वी अशी वादग्रस्त विधानं झाली आहेत.अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे आव्हान स्विकारायला ते तयार नाहीत याकडे लक्ष वेधून श्री.साईबाबांबद्दल अशा पध्दतीची नेहमीच वादग्रस्त विधानं करुन,बुध्दीभेद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो.यामुळे धार्मिक आणि सामाजिक तेढही निर्माण होते.अशा बाबा लोकांची वक्तव्य ही केवळ सवंग लोकप्रियतेचे एक थोतांड असल्याची संतप्त प्रतिक्रीया त्यांनी व्यक्त केली.श्री.साईबाबांनी आपल्या संपुर्ण वाटचालीत माणसांमध्ये देव पाहिला. म्हणूनच श्री.साईबाबांचा सबका मालिक एक असे आपण म्हणतो.श्रध्दा आणि सबुरीचा महामंत्र त्यांनी विश्वाला दिला.त्या आधारेच आज संपूर्ण विश्वाची वाटचाल सुरु आहे,लाखो भक्तांचे ते श्रध्दास्थान आहे.कुणाच्या श्रध्देवर चिखलफेक करण्याचा कोणालाही आधिकार नाही अशा शब्दात धिरेंद्र कृष्ण शास्त्रींच्या वक्तव्याचा त्यांनी समाचार घेतला.व त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी ही पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी केली.
