नगर प्रतिनिधी (दि.१४ एप्रिल):-गाडी लावण्याच्या वादातून अहमदनगर शहरातील कापड बाजार परिसरातील शहाजी चाैक येथे तीन व्यापाऱ्यांवर काही समाजकंटकांनी धारदार शस्त्राने जीवघेणा हल्ला केला.त्यात एका व्यापाऱ्याला गंभीर दुखापत झाली आहे. हल्लेखाेरांना काेतवाली व तोफखाना पाेलिसांनी संयुक्तरीत्या तपास करून ताब्यात घेतले असून पुढील तपास पाेलीस करत आहेत.याबाबत माहिती अशी की,कापड बाजार येथे गाडी लावण्यावरून दीपक नवलानी या व्यापाऱ्याशी काही समाजकंटकांनी हुज्जत घातली.त्यानंतर काही समाजकंटकांनी नवलानी व इतर दाेन जणांवर धारदार शस्त्राने हल्ला केला.त्यात नवलानी गंभीर जखमी झाले आहे. या घटनेमुळे कापड बाजार परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.दरम्यान,जखमी व्यापाऱ्यांना तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर पुढील उपचार सुरू केले आहे. घटनास्थळाला पाेलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.घटनास्थळाला जिल्हा पाेलीस अधीक्षक राकेश ओला,अहमदनगरचे पाेलीस उपअधीक्षक अनिल कातकाडे यांनी भेट दिली.
