तिघांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू जिल्ह्यातील घटना
संगमनेर प्रतिनिधी(दि.२७ एप्रिल):-अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात नांदूरी दुमाला शिवारातील प्रवरानदीतील डोहामध्ये शेळ्या-मेंढ्या धुण्यासाठी गेलेल्या दोघा तरूणांचा पाण्यात बुडून तर वडगावपान येथे तिसऱ्या तरूणाचा विहिरीतील पाण्यात बुडून मृत्यूची दुर्दैवी घटना बुधवार (ता.२६) एप्रिल रोजी दुपारी घडली आहे.तर या तिघा तरूणांच्या मृत्यूने तालुक्यावर शोककळा पसरली आहे. याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, बुधवारी दुपारी नांदूरी दुमाला शिवारातील प्रवरानदीतील डोहामध्ये सोमनाथ कचरू जेडगुले (वय ३६ रा.धुळवाडची डोंगरची वाडी ता.सिन्नर, जि.नाशिक), शुभम रावसाहेब कोटकर (वय २० रा.पिंपळे ता.संगमनेर) हे दोघेजण शेळ्या- मेंढ्या घेऊन धुण्यासाठी गेले होते. त्याठिकाणी मेंढ्या धुवत असताना त्याच दरम्यान शुभमला वाचवण्यासाठी सोमनाथ गेला असता त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने डोहात दोघेजण बुडाले. शेजारीच असलेल्या काहींनी आरडाओरड केला. त्यामुळे आजूबाजूच्या नागरिकांनी आवाजाच्या दिशेने धाव घेतली.त्यानंतर दोघांना डोहातून बाहेर काढून औषधोपचारासाठी घुलेवाडी ग्रामीण रूग्णालयात आण्यात आले होते. मात्र त्यापूर्वीच दोघांचाही मृत्यू झाला होता. याप्रकरणी विलास खंडू शिरतार (रा.धांदरफळ गोडसेवाडी) यांनी दिलेल्या खबरीवरून तालुका पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक देविदास ढुमणे यांच्या मार्गदर्शनाखाली साह्यक पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब घोडे हे करत आहे. सोमनाथ जेडगुले व शुभम कोटकर या दोघा तरूणांच्या दुर्दैवी मृत्यूने कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.तर दुसरी घटना वडगावपान येथील रविंद्र संपत थोरात (वय ३१) हा तरूण विहिरीतील पाण्यात पडल्याने त्याचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. त्यामुळे याप्रकरणी संजय विश्वनाथ थोरात यांनी दिलेल्या खबरीवरून तालुका पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.पुढील तपास पोलिस निरीक्षक देविदास ढुमणे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार एल.एम औटी हे करत आहे.दरम्यान रविंद्र थोरात या तरूणाच्या दुर्दैवी मृत्यूने वडगावपान गावावर शोककळा पसरली आहे.तर तिघाही तरूणांच्या मृत्यूने तालुक्यावर शोककळा पसरली आहे.