श्रीगोंदा प्रतिनिधी (दि.१० मे):-श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव येथे डॉक्टर असल्याचे भासवून रुग्णांवर औषधोपचार करणाऱ्या बोगस डॉक्टरवर तालुका आरोग्य अधिकारी आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई केली.त्याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून मोठा औषध साठाही जप्त केला आहे.ही कारवाई सोमवारी दि.९ मे रोजी संध्याकाळी ६ वाजता पेडगावमध्ये केली आहे.तालुका आरोग्य अधिकारी डॉ.नितीन खामकर यांच्या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.अरविंदू बिश्वास (वय २८ वर्षे,रा.भांबोरा,ता. कर्जत,जि.अहमदनगर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.याबाबत पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसार तालुका आरोग्य अधिकारी डॉ.नितीन खामकर यांना अज्ञात इसमांनी काही दिवसांपूर्वी पेडगाव येथे एक दवाखाना उघडला असून त्या डॉक्टरकडे कसल्याही प्रकारची वैद्यकीय पदवी नसल्याची माहिती दिली. मिळालेल्या माहितीनुसार डॉ. खामकर यांनी पोलिसांना माहिती दिली.त्यानुसार पोलिस निरीक्षक भोसले यांनी पोलिस उपनिरीक्षक समीर अभंग आणि त्यांच्या टीमला तालुका आरोग्य अधिकारी यांच्या सोबत बनावट डॉक्टरवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या.अॅलोपॅथीची वैद्यकीय पदवी नसताना बनावट डॉक्टरने डॉक्टर असल्याचे भासवून अॅलोपॅथिक औषधांचा वापर केला.तसेच रुग्णांवर औषधोपचार करून रुग्णांची व शासनाची फसवणूक केली. याप्रकरणी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून बनावट डॉक्टर अरोविंदू बिश्वास याला पोलिसांनी ताब्यात घेत न्यायालयात हजर केले.
