अहमदनगर प्रतिनिधी (दि.११ मे):-अहमदनगर महापालिकेच्या सर्वेक्षणानुसार अहमदनगर शहरातील १२७ अतिशय धाेकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.यातील अतिशय धोकादायक इमारती पाडण्यास महापालिकेने सुरुवात केली आहे.मागील एप्रिल महिन्यात शहरातील चितळे रोडवरील एक इमारत जमीनदोस्त करण्यात आली होती.शहरातील माळीवाडा वेस ते दिल्लीगेट अशा मुख्य परिसरात सर्व धोकादायक इमारती आहेत,महापालिकेने तेथील रहिवाशांना वारंवार नोटिसा बजावल्या आहेत.येत्या पावसाळ्यात या इमारती कधीही पडू शकतात.बहुतांश इमारती या ८० वर्षांपूर्वीच्या आहेत.महापालिकेच्या बांधकाम विभागाने मागील वर्षी पावसाळ्यात १२ धोकादायक इमारती पाडल्या होत्या.आताही पावसाळा सुरू होण्याच्या आधीच ही मोहीम महानगरपालिकेच्या वतीने राबवण्यात येणार आहे.
