अहमदनगर प्रतिनिधी(दि.१६ मे):-राज्यातील सर्वोत्कृष्ट असे दिव्यांग साधन केंद्र हे डॉ. विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनचे मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलचे असून या साधन केंद्रावर दिव्यांगासाठी विविध योजना ह्या राबविल्या जात असून दिव्यांगांचे आयुष्य हे सक्षम करण्यासाठी फाउंडेशनच्या वतीने चांगले काम केले जाते ही कौतुकास्पद बाब असल्याचे अपंग कल्याण आयुक्त ओमप्रकाश देशमुख यांनी सांगितले.ते डॉ.विठ्ठलराव विखे पाटील फाउंडेशनचे मेडिकल कॉलेज व हॉस्पिटलच्या वतीने आयोजित सहाय्यक साधन वाटप कार्यक्रमात बोलत होते.यावेळी व्यासपीठावर फाउंडेशनचे विश्वस्त वसंतराव कापरे,श्री.राधकीसन देवढे, जिल्हा समाजकल्याण अधिकारी अहमदनगर यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी बोलताना ते म्हणाले की दिव्यांगाना आधार देणे हे खूप महत्त्वाचे कार्य असून नुसता आधारच नाही तर त्यांना कौशल्यपूर्ण प्रशिक्षण देणे हेही तितकेच महत्त्वाचे असे आहे. दिव्यांगाना खंबीरपणे साथ देत त्यांच्यात ही उद्योजकता रुजविणे हे कठीण कार्य आपल्या फाउंडेशनच्या वतीने सातत्याने करण्यात येत आहे. राज्यात आपले फाउंडेशन हे सर्वोत्कृष्ट काम करत असून केवळ वैद्यकीय उपचार नाही तर तो दिव्यांग स्वतःचा पायावर उभा राहून कुटुंबाचा उदरनिर्वाह सक्षमपणांनी करू शकेल असा विश्वास विखे पाटील कुटुंबीय त्या दिव्यांगाना देते याबद्दल त्यांचे मनापासून आपण आभार व्यक्त करतो असे त्यांनी सांगताना शासनस्तरावर नामदार विखे पाटील आणि केंद्रीय स्तरावर खा.डॉ.सुजय विखे हे नवनवीन योजना ह्या आणतात त्याबद्दल या दोघांचे मनापासून आभार व्यक्त केले. शासन आपल्यास्तरावर नाविन्य पूर्ण योजना राबवित असताना याची अमलबजावणी ही विखे पाटील यांच्या सारख्या संस्था ह्या ध्येयाने प्रेरित होउन करतात हे विशेष.दिव्यांगाना जे साधने दिली जातात त्यातून यांचे जीवनमान हे नक्की उंचावणार याची खात्री असून केवळ साहित्य नाही तर मान सन्मान देखील अशा संस्थांच्या वतीने दिला जातो हे खूप महत्त्वाचे असल्याचे देशमुख यांनी आपल्या भाषणात सांगितले.दिव्यांगाना सन्मानाने जगण्यासाठी फाउंडेशनच्या माध्यमातून केले जात असलेल्या प्रयत्नांना मुळे आपण खूप भारावून गेलो असून भविष्यातही त्यांनी याही पेक्षा चांगले काम करावे असे आवाहन आयुक्त देशमुख यांनी याप्रसंगी केले.यावेळी समारोहात दिव्यांगाना सहाय्यक साधने वाटप करण्यात आले.समारोहास दिव्यांग तरुण तरुणी,मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेवटी मेडिकल कॉलेजचे डायरेक्टर व जिल्हा पुनर्वसन केंद्रचे संचालक डॉ.अभिजीत दिवटे यांनी सर्वांचे आभार मानले.
